नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान आता जेईई मेनची चौथ्य़ा टप्प्यात होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन मे सत्राची परीक्षा (JEE Main 2021 May Postponed) पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत असल्याने जेईई मेन 2021 एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. त्यानंतर आता जेईई मेन परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता जेईई मेन 2021 (मे) परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली होती. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे जेईई मेन 2021 एप्रिल सत्राची परीक्षा 27 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत घेण्यात येणार होती.
जेईई मेन परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली होती. यंदाची परीक्षा चार टप्प्यांमध्ये नियोजित होती. त्यापैकी दोन टप्प्यांमधली परीक्षा पार पडली होती. तिसऱ्या टप्प्यातली परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती आणि आता चौथ्या टप्प्यातली परीक्षाही स्थगित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर अधिक माहितीसाठी लक्ष ठेवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी जेईई मेन परीक्षा चार सत्रात आयोजित करत आहे. यापैकी दोन सत्र पूर्ण करण्यात आले आहेत. पहिलं सत्र 23-26 फेब्रुवारी 2021 दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं. तर दुसऱ्या सत्राचं आयोजन 16-18 मार्च दरम्यान आयोजित केलं गेलं होतं. पहिल्या सत्रात 6 लाख 20 हजार 978, तर दुसऱ्या सत्रात 5 लाख 56 हजार 248 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.