उत्तर प्रदेश, दि. 21 - मोदी सरकार आणि एनडीएच्या विरोधात विरोधी पक्ष एकजुटीचे प्रयत्न करतायत. आता बहुजन समाज पक्षानंही सामाजिक हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. बहुजन समाज पक्षानं ट्विटरवर एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यात मायावती, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, सोनिया गांधींसह अनेक नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय.मात्र बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव एस. सी. मिश्रा यांनी सांगितलं की, फोटो शेअर करण्यात आलेलं ट्विटर अकाऊंट हे बहुजन समाज पक्षाचं अधिकृत अकाऊंट नाही. खरंतर 2014च्या देशातील परिवर्तनानंतर राजनैतिक घडामोडींना वेग आला आहे. भाजपानं आतापर्यंत अनेक राज्यांत सत्ता स्थापन केली आहे. तसेच राजकारणातही भाजपाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं विरोधी पक्षांसाठी स्वतःचं अस्तित्व टिकवणं मोठं आव्हान आहे. त्यामुळेच विरोधी पक्ष स्वतःमधील मतभेद विसरून एकत्र येण्याचं अपील करत आहेत. बहुजन समाज पक्ष हा कधीही युती करण्यापासून टाळाटाळ करत आला आहे. मात्र आता ट्विटरच्या माध्यमातून फोटो शेअर करत बहुजन समाज पक्षानं सामाजिक हितासाठी अखिलेश यादवपासून सोनिया गांधींपर्यंत सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. बहुजन समाज पक्षानं शेअर केलेल्या फोटोमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, जेडीयू नेते शरद यादव, आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अखिलेश यादवांचाही समावेश आहे. या सर्व नेत्यांमध्ये मायावतींचा फोटो सर्वात मोठा दाखवण्यात आला आहे. मायावती उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला सर्वात मोठा शत्रू मानते.मात्र आता मायावती त्याच समाजवादी पक्षाला सोबत घेऊन काम करू इच्छिते आहे. मात्र काही वर्षांपूर्वी मायावतींवर समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी गेस्ट हाऊसमध्ये हल्ला केला होता. त्यावेळी भाजपा नेत्यानं मायावतींचा जीव वाचवला आहे. त्यामुळे निकराचा विरोध असतानाही मायावतींनी एकत्र येण्याचं अपील केलं आहे. समाजवादी पार्टीसोबत एकत्र येण्याचं आवाहन केल्यामुळे मायावतींची राजकीय अपरिहार्यता दिसून येते आहे.