लखनऊ - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते काश्मीर दौऱ्यावर गेले होते. त्यावर बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी जोरदार टीका केली आहे. कोणताही विचार न करता काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं मायावती यांनी सांगितले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि विरोधी पक्षाचे नेते यांनी काश्मीर दौऱ्यावर जाण्याचा चुकीचा निर्णय घेतला त्यामुळे केंद्र आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांना राजकारण करण्याची संधी मिळाली असल्याचा आरोप मायावती यांनी केला.
कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमधील वातावरण सर्वसामान्य होण्यासाठी काही वेळ लागेल. मायावती यांनी ट्विट करत बसपाने संसदेत कलम 370 हटविण्याला समर्थन दिलं होतं हे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी आपल्या देशातील समानता, एकता आणि अखंडतेच्या बाजूने राहिले होते. त्यामुळे ते जम्मू काश्मीर राज्याला कलम 370 लागू करण्याच्या समर्थनार्थ नव्हते. त्याचसाठी बसपाने संसदेत कलम 370 हटविण्याचं समर्थन केलं.
कलम 370 हटविल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती सर्वसामान्य व्हायला वेळ लागणार आहे. देशात संविधान लागू झाल्यानंतर 70 वर्षाने कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती सुधारण्यासाठी वाट पाहणे योग्य राहील. कोर्टानेही काश्मीर मुद्द्यावर सरकारला वेळ द्यावा अस सांगितलं आहे. त्यामुळे यावर राजकारण करणे योग्य राहणार नाही असं मायावती यांनी सांगितले.
काश्मीरमधील परिस्थिती पाहता अशावेळी काँग्रेस आणि अन्य पक्षाच्या नेत्यांकडून काश्मीरमध्ये जाणे म्हणजे केंद्र आणि जम्मू काश्मीरमधील राज्यपाल सत्यपाल मलिक यांना राजकारण करण्यासाठी संधी देणे असा निर्णय नाही का? त्याठिकाणी जाण्यापूर्वी थोडा विचार केला असता तर योग्य राहिलं असतं असा टोला मायावती यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना लगावला आहे.
शनिवारी राहुल गांधी श्रीनगर विमानतळावर पोहोचले. राहुल यांच्यासोबत विरोधी पक्षातील 8 घटक पक्षांचे एकूण 11 नेते सोबत होते. जम्मू आणि काश्मीरसंदर्भातील कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आले होते. जम्मू काश्मीरमध्ये जाऊन येथील परिस्थितीचा आढावा घेत स्थानिक नेत्यांसह, सामान्य नागरिकांची राहुल गांधी भेट होते. मात्र, राहुल यांना श्रीनगर विमानतळावरुन आतमध्ये सोडण्यात आले नाही. सुरक्षेच्या कारणास्तव राहुल यांना श्रीनगर विमातळावरच अडकून पडावे लागले होते. त्यानंतर काही काळ गोंधळ उडाला. अखेर श्रीनगर विमानतळावरुन त्यांना दिल्लीला परत फिरावे लागले होते.