बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी आज लखनौमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला. माहितीनुसार, बसपाच्या बैठकीत मायावतींनी त्यांचा भाचा आकाश आनंदला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. यामुळे आता उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोप सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
आकाश आनंद यांनी लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन केले आहे. त्यांचा राजकारणात प्रवेश २०१७ मध्ये झाला होता, तेव्हा ते सहारनपूरच्या सभेत पहिल्यांदा मायावतींसोबत स्टेजवर दिसले होते. आकाश सध्या पक्षाचा राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम करतात.
उत्तर प्रदेशमध्ये आकाश आनंद यांना लॉन्च केल्यानंतर बसपा बॅगफुटवर गेली होती. २०१७ आणि २०१९ मध्ये पक्षाचा मोठा पराभव झाला, तर २०२२ च्या यूपी निवडणुकीत बसपा फक्त एका जागेवर मर्यादित राहिला.
मायावतींनी आपल्या भाच्याला उत्तराधिकारी म्हणून घोषित करताच आकाश आनंद यांच्या संघटनात्मक क्षमतेबाबत राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. बसपाने अनुभवी नेत्यांकडे दुर्लक्ष करून तरुण चेहऱ्याचे नाव का समोर आणले? याबाबत अद्याप कोणतीही राजकीय प्रतिक्रिया आलेली नाही. पण त्यामागचा हेतू स्पष्टपणे दिसतोय की, मायावतींना आकाश आनंदला भविष्यातील राजकारणासाठी तयार करायचे आहे, त्यांना निवडणुकीतील डावपेच, तिकीट वाटप, निवडणूक प्रचार आणि इतर बाबींचा अनुभव घेता येईल.