नवी दिल्ली: 2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. युपी-बिहारच्या निवडणुकीत नेहमीच अनेक बाहुबली नेत्यांना विविध पक्षांकडून तिकीट दिले जाते. यात बाहुबली नेते मुख्तार अंसारी यांच्या नावाचा समावेश असतो. पण, यंदा बसपा अध्यक्ष मायावती यांनी कोणत्याही माफिया किंवा बाहुबली नेत्याला तिकीट देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बसपा सुप्रीमो मायावती यांनी शुक्रवारी एक ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, "बीएसपी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कोणत्याही बाहुबली नेते किंवा माफियाला तिकीट देणार नाही. याच पार्श्वभूमीवर आजमगडच्या मऊ विधानसभा क्षेत्राचे आमदार मुख्तार अंसारी यांना यंदा बसपाकडून तिकीट मिळणार नाही. त्यांच्या जागी बसपा प्रदेशाध्यक्ष भीम राजभर यांना मऊमधून तिकीट दिले जाईल."
त्या पुढे लिहीतात, लोकांच्या प्रयत्नांतून आणि त्यांच्या अपेक्षांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवार निवडताना विशेष काळजी घ्यावी, असे आव्हान मी पक्षाच्या प्रभारींना करते. 'कायद्याने कायद्याचे राज्य' या संकल्पातूनच आपल्याला राज्याचे चित्र बदलायचे आहे. असे राज्य बनवायचे आहे, की प्रत्येक जण म्हटला पाहिजे, राज्य असवं तर मायावतींच्या 'सर्वजन हिताय आणि सर्वजन सुखाय'उत्तर प्रदेश सारखं असाव, असे त्या म्हणाल्या.
मुख्तार अंसारी मऊ विधानसभा मतदारसंघातून बसपाचे आमदार आहेत. मुख्तार यांची पक्षातून हकालपट्टी करुन त्यांच्या तिकीट कापले जाईल, अशी मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता स्वतः मायावतींनी ट्विट करुन त्यांचे तिकीट कापल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केला.