लखनौ : ‘एक देश, एक निवडणूक’ या विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी राजकीय पक्षांना केले. यामुळे निवडणुकांवर होणारा खर्च वाचणार असून, लोककल्याणाची कामे थांबणार नसल्याचे स्पष्ट करत विधेयकाला मायावतींनी पाठिंबा दिला.
एससी, एसटी, ओबीसी आरक्षणात छेडछाड होणार नाही, यासाठी नवव्या अनुसूचीत समावेश करण्याची मागणी मायावतींनी केली. नवव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेले केंद्र व राज्यांच्या कायद्यांची न्यायालय समीक्षा करू शकत नसल्याचे त्या म्हणाल्या. संविधानावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी व विरोधकांनी विशेष करून काँग्रेस व सपाने देशातील एससी, एसटी व ओबीसी वर्गाच्या आरक्षणावर मोठ्या बाता मारल्या. आरक्षणावर काँग्रेस व सपा गप्प राहिले असते तर चांगले झाले असते. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना सत्ताधाऱ्यांनी सपासोबत संगनमत करून एससी, एसटी वर्गाच्या पदोन्नती आरक्षणाशी संबंधित संवैधानिक संशोधन विधेयकाला विरोध केला. सपाने हे विधेयक फाडले होते. त्यामुळे हे विधेयक संसदेत मंजूर होऊ शकले नसल्याचा दावा करत मायावतींनी काँग्रेस व सपावर टीका केली.