नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या निवडणुकीत समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) या महाआघाडीने काँग्रेससाठीअमेठी आणि रायबरेली या जागा का सोडल्या, यासंदर्भात बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी खुलासा केला आहे.
'आम्ही देशाचे हित लक्षात घेऊन भाजपा आणि आरएसएसवादी शक्तींना दुर्बल करण्यासाठी उत्तर प्रदेशात लोकसभा मतदारासंघातील अमेठी व रायबरेली या जागा काँग्रेसला दिल्या आहेत. कारण, या दोन्ही जांगावरुन दोन सर्वोच्च नेत्यांनी निवडणूक लढवावी आणि या दोन जागांमध्ये त्यांनी अडकून राहू नये. याशिवाय, काँग्रेसच्या या दोन्ही उमेदवारांना महाआघाडीचे मते मिळतील.' असे मायावती म्हणाल्या.
याचबरोबर, मायावती यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीमध्ये फूट पाडून उत्तर प्रदेशात सत्ता मिळविण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत, असे मायावती यांनी सांगितले.
दरम्यान, लोकसभेसाठी उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पार्टी 38 तर समाजवादी पार्टी 37 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये काँग्रेसाठी अमेठी आणि रायबरेली या सोडल्या आहेत. तर मथुरा, बागपत आणि मुझफ्फरनगरच्या जागा राष्ट्रीय लोकदल पक्षाला देण्यात आल्या आहेत.