वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून जिंकवून आणण्यासाठी बाहेरच्या गुंडांकडून स्थानिक नागरिकांना धमकावण्याचे प्रकार सुरु असल्याचा गंभीर आरोप बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी भाजपावर केला आहे. मायावती यांनी ट्विट करत हा आरोप केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, वाराणसीमध्ये कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी यांना जिंकविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. वाराणसीतील गल्लीबोळात जाऊन घरांमध्ये जाऊन पहिल्यांदा आमिष दाखवूननंतर धमकी दिली जात आहे. त्यामुळे तेथील निवडणूक स्वतंत्र्य आणि निष्पक्ष कशा होणार? बंगालप्रमाणे निवडणूक आयोगाचे वाराणसीमध्ये लक्ष का नाही? असा सवाल मायावती यांनी उपस्थित केला आहे.
याआधी पश्चिम बंगालमध्ये घडलेला प्रकार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपाच्या काही नेत्यांनी ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला होता. निवडणुकीचा असा प्रचार धोकादायक आणि अन्यायकारक आहे. अशाप्रकारचं राजकारण पंतप्रधानपदाला शोभणारं नाही असा आरोप बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी भाजपावर केला होता.
तसेच पश्चिम बंगालमधील राड्यानंतर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये एक दिवस आधीच प्रचारबंदी केली. मात्र हा प्रचार रात्री 10 वाजेर्यंत ठेवण्यात आला कारण पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा होणार होत्या. जर निवडणूक आयोगाला प्रचारबंदी करायची होती तर ती सकाळपासून का केली नाही? असा सवाल उपस्थित करत मायावती यांनी निवडणूक आयोगावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले होते. तर राजकीय लाभासाठी आपल्या पत्नीला सोडणारे नरेंद्र मोदी हे बहीण आणि पत्नीचा सन्मान करणे म्हणजे काय हे कसे जाणणार अशी टीका मायावतींनी सीरगोवर्धन येथील सभेत केली होती. त्याचसोबत ''सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे. पराभव समोर दिसत असल्याने संघानेही भाजपाची साथ सोडली आहे असंही मायावती यांनी म्हटलं होतं.