लखनौ : आपल्या कुटुंबियांना भाजप लक्ष्य करीत आहे असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी केला आहे. मायावतींचा भाऊ आनंदकुमार यांची बेनामी संपत्ती असलेला नॉयडा येथील ४०० कोटी रुपये किमतीचा भूखंड प्राप्तीकर खात्याने ताब्यात घेतला. त्या पार्श्वभूमीवर मायावतींनी सांगितले की, भाजप नेत्यांकडे किती संपत्ती आहे याचीही मोदी सरकारने चौकशी करावी.यासंदर्भात मायावतींनी शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, भाजपच्या नेत्यांकडे किती संपत्ती आहे याची मोदी सरकार व त्याच्या तपास यंत्रणांनी चौकशी करावी. भाजप नेत्यांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी त्यांची असलेली स्थावर व जंगम मालमत्ता व आता त्यांच्याकडे असलेली संपत्ती यांची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.मायावती यांनी आरोप केला की, यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकांत जनतेची मते आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपने दोन हजार कोटी रुपये खर्च केले. लोकसभा निवडणुकांनंतर भाजप उत्तर प्रदेशमध्ये जातीपातीच्या आधारे आपल्या राजकीय खेळी करत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. >सर्वोच्च न्यायालयामुळे मला न्याय मिळालाकेंद्र सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना खोट्यानाट्या प्रकरणांत गोवत आहे, असा आरोप मायावती यांनी गुरुवारी केला होता. आपला भाऊ व बहीण यांचा सरकारने छळ मांडला असून, अशा कारवाईला मी भीक घालणार नाही असेही त्यांनी म्हटले होते. २००३ साली तत्कालीन भाजप सरकारने प्राप्तीकर खाते, सीबीआयला हाताशी धरून माझ्यावरही काही खटले दाखल केले; पण त्याविरोधात मी दिलेल्या प्रदीर्घ लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून मला न्याय मिळाला.
भाजप नेत्यांकडील संपत्तीचीही चौकशी करण्याची मायावती यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 4:22 AM