नवी दिल्ली : मायावती यांचे बंधू आनंद कुमार यांच्या संपत्तीमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आनंद कुमार यांची संपत्ती २00७ ते २0१४ या सात वर्षांमध्ये साडेसात कोटी रुपयांवरून १३१६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचे उघड झाले आहे. यातील काही काळ मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीही होत्या. आकृती हॉटेल्स प्रायवेट लिमिटेड कंपनीमुळे मायावती अडचणीत सापडू शकतात. या कंपनीत आनंद कुमार यांची महत्त्वाची भूमिका आहे.आकृती हॉटेल्स ही दिल्लीस्थित कंपनी आहे. भास्कर फंड मॅनेजमेंट लिमिटेड, क्लिफ्टन पिअरसन एक्सपोर्ट, डेल्टॉन एक्सिम प्रायवेट लिमिटेड, गंगा बिल्डर या कंपन्यांचे आकृती हॉटेल्समध्ये ५ लाख १५0 शेअर्स आहेत. या तीन कंपन्यांची कार्यालये कोलकात्यात एकाच इमारतीत असून, तिन्ही कंपन्यांचे संचालकही सारखेच असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. आकृती हॉटेल्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या काही कंपन्यांची कार्यालये नमूद केलेल्या पत्त्यावर नसून, शेअर होल्डर्सच्या संख्येमध्येही गौडबंगाल असल्याचा दावा कागदपत्रांच्या आधारे वृत्तवाहिनीने केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) कागदपत्रे मिळालीप्राप्तिकर खात्याच्या चौकशीतून बनावट कंपन्या, कोट्यवधी रुपयांची घेतलेली कर्जे, रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक अशी माहिती समोर आली आहे. ही कागदपत्रे एका वृत्तवाहिनीने मिळवली आहेत.
भावाच्या अवाढव्य संपत्तीमुळे मायावती येणार अडचणीत?
By admin | Published: January 11, 2017 1:18 AM