लखनऊ: लोकसभा निवडणुकीआधी महाआघाडी करुन भाजपाची कोंडी करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसलामायावतींनी धक्का दिला आहे. मध्य प्रदेश, राजस्थानात काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या मायावतींनी घेतला आहे. काँग्रेसचा दृष्टीकोन जातीयवादी असून त्या पक्षातील काहींना दोन्ही पक्षांची आघाडी नको असल्याचं मायावतींनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या सोहळ्यात देशातील भाजपाविरोधी पक्षांचे महत्त्वाचे नेते एकत्र आले होते. त्यावेळी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मायावतींनी एकमेकांना आलिंगन दिलं होतं. तेव्हापासून मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेस आणि बसपाची आघाडी होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र काँग्रेसच्याच काही नेत्यांना आघाडी करण्याची इच्छा नसल्याचं म्हणत मायावतींनी 'एकला चलो रे'चा पवित्रा घेतला आहे. दिग्विजय सिंहसारख्या काँग्रेसच्या नेत्यांना आघाडी व्हावी, असं वाटत नाही. कारण त्यांना ईडी आणि सीबीआयसारख्या तपास यंत्रणांची भीती वाटते, असा शाब्दिक हल्ला मायावतींनी चढवला. दिग्विजय सिंह हे भाजपाचे एजेंट आहेत. त्यामुळेच ते तथ्यहीन विधानं करतात. केंद्र सरकारकडून दबाव आणल्यानं मायावतींना आघाडी करण्यात रस नाही, या दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यात जराही तथ्य नाही, अशी टीका मायावतींनी केली. दिग्विजय सिंह यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्या मायावतींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं कौतुक केलं. 'सोनिया आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस-बसपाच्या आघाडीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांवर काँग्रेसच्याच नेत्यांनी पाणी फेरलं,' असं मायावती म्हणाल्या.
हाताला हत्तीची साथ नाही; काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा मायावतींचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 4:55 PM