नवी दिल्ली : देशातील समस्या सोडविण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच विरोधी पक्षांनी महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली केली आहे. यामध्ये काँग्रेससह अन्य 19 पक्षांचा समावेश आहे. मात्र गेल्या काही दिवसांतील घडामोडीवरून महाआघाडीमध्ये प्रत्येक पक्ष आपला स्वार्थ आणि अस्तित्व दाखवत असल्याचे दिसून येत आहे. महाआघाडीतील एक असेलेल्या मायावती यांनी आपल्याला सन्मानजनक जागा मिळाल्या तरच काँग्रेसबरोबर आघाडी करणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता महाआघाडीत बिघाडीची चिन्हे दिसू लागली आहेत. दुसरीकडे अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधकांच्या एकीचा फुगा फुटण्याचीच चिन्हे दिसल्याने दुसरीकडे भाजपाच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या असतील.
मोदी विरोधात एकत्र येणाऱ्या महाअघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचे दिसून येतेय. बसपा प्रमुख मायावती यांनी स्पष्ट केले आहे की, जर व्यवस्थित जागा मिळाल्या तरच आघाडीसाठी तयार आहे. छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानमध्ये होणाऱ्या निवडणुकीत कांग्रस-बसपा आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. आशामध्येच मायावती यांनी केलेले हे वक्तव्यावरुन कांग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असेल. आज माध्यमांशी बोलताना मायावती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्याबरोबरच भाजपावर कडाडून टीकास्त्रही सोडले. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील असल्याचा दावा राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे.
फक्त राहुल गांधीच नव्हे तर विरोधी पक्षांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आणि बसपच्या प्रमुख मायावती हे देखील या शर्यतीत असल्याचा दावा राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. तेजस्वी यादव यांच्या या दाव्यामुळे कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांच्या स्वप्नांना मात्र सुरुंग लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 2019च्या निवडणुकीत जर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असा ठराव करण्यात आला होता. काँग्रेसच्या या ठरावावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.