नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला अनेक दिग्गज नेते अनुपस्थित राहणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांचा समावेश आहे. आज रात्री नवी दिल्लीत इफ्तार पार्टी होत असून या पार्टीसाठी 17 पक्षांना आमंत्रण देण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष म्हणून राहुल गांधींनी प्रथमच इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून विरोधकांना एकत्र आणून शक्तीप्रदर्शन करण्याचा राहुल गांधींचा मानस आहे. मात्र या पार्टीला शरद पवार, ममता बॅनर्जी आणि मायावती अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. या पार्टीचं निमंत्रण माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील आणि माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनाही देण्यात आलं आहे. या तिन्ही मान्यवरांनी हे आमंत्रण स्विकारलं आहे. भाजपा विरोधकांना एकाच कार्यक्रमात आणण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, लोकतांत्रिक जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव, माकपचे सीताराम येचुरी, बसपाचे नेते सतीश मिश्रा, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, डीएमकेच्या नेत्या कनिमोळी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, कम्युनिस्ट नेते डी. राजा आणि तृणमूल काँग्रेसचे नेते दिनेश त्रिवेदी हे नेते इफ्तार पार्टीला उपस्थित राहणार आहेत. याआधी 2015 मध्ये काँग्रेसनं इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं.
आज राहुल गांधींची इफ्तार पार्टी; मायावती, ममता बॅनर्जी, शरद पवार अनुपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 4:05 PM