लखनऊ : बसपा सुप्रिमो मायावती आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव हे तब्बल दोन तप म्हणजेच 24 वर्षांनी एकाच मंचावर येणार आहेत. महत्वाचे म्हणजे मायावती या मुलायम सिंहांसाठी मत मागणार आहेत. मुलायमसिंह हे मैनपुरी मतदारसंघातून लोसकभेचे उमेदवार आहेत.
सपा-बसपा आणि रालोद महाआघाडीच्या संयुक्त सभा उत्तर प्रदेशमध्ये होत आहेत. मात्र, आजपर्यंत कधीही मायावती आणि मुलायमसिंह एकत्र आले नव्हते. मायावती या अखिलेश यादव यांच्यासोबत सभा घेत होत्या. उत्तरप्रदेशच्या सत्तेच्या राजकारणामुळे सपा आणि बसपातून विस्तवही जात नव्हता. यामुळे हे दोन्ही नेते कधीच एका मंचावर आले नव्हते. आज हा योग जुळून आला आहे.
मायावतींची बंदीनंतर पहिलीच सभानिवडणूक आयोगाने मायावती यांच्यावर प्रचारबंदीची केलेली कारवाई संपल्यानंतर त्यांनी थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारबंदीचे उल्लघंन करत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल निवडणूक आयोगाला मायावती यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरुन निवडणूक आयोगावर टीका केली आहे. आजची सभा त्यांची या बंदी उठल्यानंतरची पहिलीच सभा असणार आहे.
निवडणूक आयोगाच्या प्रचारबंदीचे उल्लंघन करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शहरात, मंदिरांत आणि दलितांच्या घराबाहेर जाऊन जेवण करण्याचे नाटक करत आहेत. त्याचे प्रसारण मीडियामध्ये करुन निवडणूकीत लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्यावर आयोग दया का दाखवत आहे, असा सवाल मायावती यांनी केला आहे.जर असा भेदभाव आणि भाजपा नेत्यांच्या बाबतीत निवडणूक आयोग कानाडोळा करत असेल तर ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष होण्याची शक्यता कठिण आहे, असेही मायावती यांनी म्हटले आहे.