रायपूर/नवी दिल्ली : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत विजयी ठरणारा पक्ष केंद्रात 2019 मध्ये किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहे, असा दावा काँग्रेसचे बंडखोर नेते अजित जोगी यांनी केला आहे. अजित जोगी यांनी छत्तीसगड निवडणुकीत काँग्रेसची साथ सोडत छत्तीसगड जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली आहे. आगामी निवडणुकीत त्यांनी बहुजन समाज पार्टी (बसपा) आणि डाव्यांशी आघाडी केली आहे. या निवडणुकीत त्यांनी स्वतःला मुख्यमंत्री पदाचा दावेदार सांगितले आहे, तर बसपाच्या अध्यक्षा मायावती या पंतप्रधान पदासाठी फरफेक्ट असल्याचा दावा केला आहे.
अजित जोगी हे छत्तीसगड राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. ते म्हणाले, ''2019च्या निवडणुकीत काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष यांच्या सोबत नसलेला पक्ष सत्तेत दिसेल. त्यानंतर पंतप्रधानाचा उमेदवार ठरवला जाईल, परंतु या पदासाठी मायावती या परफेक्ट आहेत, असे मला वाटते.'' जोगी हे आयपीएस आणि आयएएस अधिकारी होते. 1986 मध्ये त्यांना राज्यसभा सदस्यत्व देण्यात आले. तीन दशकं काँग्रेससोबत असलेल्या जोगी यांनी 2016 काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. विधानसभेच्या 90 जागांसाठी छत्तीसगडमध्ये 12 व 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.