ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 24- राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर बसपा प्रमुख मायावती यांनी भाजपला घेरण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. मायावती प्रत्येक महिन्याच्या 18 तारखेला उत्तर प्रदेशातील विविध भागांमधून रॅली काढणार आहेत. मायावतींच्या या रॅलींची सुरूवात 18 सप्टेंबरपासून होणार असून 18 मे 2018 रोजी या रॅलीचा समारोप होइल. या दरम्यान एकुण 9 सभा मायावतींकडून घेतल्या जाणार आहेत. रविवारी नवी दिल्लीत बसपाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 18 सप्टेंबरला निघणारी पहिली रॅली मीरूत आणि सहारणपूर इथून निघेल.
आणखी वाचा
मायावतींचा राजीनामा मंजूर, पुन्हा दिला होता राजीनामा
मायावतींनी दिला राज्यसभेचा राजीनामा
मायावतींना संताप अनावर
या रॅलीच्या माध्यमातून बसपाच्या प्रमुख मायावती सहारणपूरमधील जातिय हिंसाचार तसंच दलितांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल आवाज उठवणार आहेत. तसंच दलितांचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे, हे जनतेला सांगण्याचाही मायावतींकडून प्रयत्न केला जाइल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यसभेत सहारणपूरच्या मुद्द्यावर मला जाणीवपूर्वक बोलू दिलं नाही, तसंच माझा आवाज दाबण्यासाठी सरकारी पक्षाच्या मंत्र्यांनी घोषणाबाजी केली, असं मायावती या पक्षाच्या बैठकीत म्हणाल्या आहेत. म्हणूनच राजीनामा देऊन लोकांमध्येच त्यांचा आवाज उठवणं योग्य असल्याचं मायावतींनी सांगितलं आहे.
बसपाकडून निघणाऱ्या रॅलीच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करण्याचं काम केलं जाइल. तसंच एनडीए सरकारला सत्तेतून बाहेर काढून जातीवादी धोरणातून तसंच हुकुमशाहीवृत्तीतून लोकांना मुक्त केलं जाणार आहे. आधी 18 ऑगस्टपासून अभियान सुरू करायचं होतं पण पावसामुळे आता 18 सप्टेंबरपासून हे अभियान सुरू केलं जाणार आहे. 18 जुलै रोजी राज्यसभेत सहारणपूरमधील जातिय हिंसाचाराचा मुद्दा मांडला होता त्यामुळे राजीनामाही द्यावा लागला होता, म्हणूनच प्रत्येक महिन्याच्या 18 तारखेला रॅली काढली जाणार असल्याचं मायावती यांनी सांगितलं आहे.
राज्यसभेत मुद्दा मांडू न दिल्याने राजीनामा
राज्यसभेत 18 जुलै रोजी उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथील दलितांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी मुद्दा उपस्थित करणार्या बसपाप्रमुख खा. मायावती यांना उपसभापती पी. जे. कुरियन यांनी बोलू न दिल्याने त्यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याची धमकी देत सभात्याग केला. त्यानंतर सभापती तथा उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला. देशात जेथे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे तेथे दलितांवर अत्याचार होत आहेत. या अत्याचारांबाबत मला जर सभागृहात बोलू दिलं जात नसेल तर मी राजीनामा देते असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला.
त्यावेळी राज्यसभा सभापतींच्या कार्यालयात राजीनामा देण्यासाठी जात असताना मायावती यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला, खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी सभापतींचं कार्यालय गाठून मायावती यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या निर्णयावर ठाम राहत मायावती यांनी सभापतींकडे राजीनामा सुपुर्द केला.
राज्यसभेत सहारणपुर हिंसेवर बोलू न दिल्याने बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी त्यांच्या राजसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मायावतींना सहारनपुर हिंसा प्रकरणी बोलायचं होतं. पण सभागृहात त्याचा विरोध होत होता. तर सभापतींनीही त्यांना वेळ पूर्ण झाल्यानंतर थांबण्यास सांगितलं. याचा विरोध करत मायावती राज्यसभेत चांगल्याच भडकल्या होत्या.