लखनऊ - घराणेशाहीला विरोध करणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्याच पक्षात आता घराणेशाही सुरु असल्याचे पहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये आज पार पडलेल्या बहुजन समाज पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मायावती यांनी पक्षात फेरबदल केले आहेत. मायावती यांनी भाऊ आनंद कुमार यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर पुतण्या आकाश आनंदला राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मायावती यांनी देशभरातील पक्षाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. लोकसभा निवडणुकीत बसपाला १० जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. पुढील निवडणुकीत ही चांगले यश मिळावे म्हणून आतापासूनच कामाला लागा असे आदेश यावेळी मायावतींनी दिले. याचवेळी,मायावती यांनी पक्षात फेरबदल केलं. मायावती यांनी भाऊ आनंद कुमार यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर पुतण्या आकाश आनंदला राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे.
राजकीय पक्षात वाढत असलेल्या घराणेशाहीला मायावती यांनी अनेकदा विरोध केला आहे. काँग्रेस पक्षावर याच मुद्यावरून त्यांनी अनेकदां उघडपणे टीका केली आहे. घराणेशाहीला विरोध करणाऱ्या मायावती यांनी पक्षाच्या बैठकीत भावाला राष्ट्रीय उपाध्यक्ष तर पुतण्याला राष्ट्रीय समन्वयकाची मोठी जबाबदारी दिली. त्यामुळे आता त्यांच्याच पक्षात घराणेशाही सूर झाली असल्याची राजकीय चर्चा रंगताना दिसत आहे.