काँग्रेसने दलितांकडे दुर्लक्ष केल्यामुळे 'बसपा'ची स्थापना, मायावतींचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 05:49 PM2019-12-28T17:49:09+5:302019-12-28T17:49:44+5:30
मायावती यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
लखनऊ : बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. काँग्रेसच्या 'भारत बचाओ-संविधान बचाओ' रॅलीवर निशाणा साधत मायावती यांनी काँग्रेसला सत्तेत असतेवेळी जनतेचे हित का लक्षात आले नाही, असा सवाल केला. तसेच, दुसऱ्यांची चिंता करण्यापेक्षा काँग्रेसने आपल्या स्थितीवर आत्मचिंतन केले तर चांगले होईल, असा टोलाही मायावती यांनी लगावला.
मायावती यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाला, "काँग्रेस आपला स्थापना दिवस 'भारत बचाओ-संविधान बचाओ' रॅलीच्या माध्यमातून साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांची चिंता व्यक्त करण्यापेक्षा काँग्रेसने स्वत: आपल्या स्थितीवर आत्म-चिंतन केले असते तर चांगले झाले असते. त्यातून बाहेर पडायला काँग्रेसला आता वेगवेगळी नाटकबाजी करावी लागत आहे."
2. ’भारत बचाओ, संविधान बचाओ’ की याद कांग्रेस को तब क्यों नहीं आयी जब वह सत्ता में रहकर जनहित की घोर अनदेखी कर रही थी जिसमें दलितों, पिछड़ों व मुस्लिमों को भी उनका संवैधानिक हक नहीं मिल पा रहा था जिसके कारण ही आज बीजेपी सत्ता में बनी हुई है, तभी फिर BSP को भी बनाने की जरूरत पड़ी।
— Mayawati (@Mayawati) December 28, 2019
दुसऱ्या ट्विटमध्ये मायावती म्हणाल्या, "ज्यावेळी दलित, मागास आणि मुस्लिमांना संवैधानिक हक्क मिळत नव्हता. त्यावेळी काँग्रेसला 'भारत बचाओ-संविधान बचाओ'ची आठवण का आली नाही. सत्तेत असताना काँग्रेस याकडे कानाडोळा करत होती म्हणून बहुजन समाज पार्टीची स्थापना करावी लागली. त्यामुळे आज भाजपा सत्तेत आहे."
दरम्यान, उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर हल्लाबोल केला. तसेच, नाव न घेता समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीवर या विरोधी पक्षांवरही निशाणा साधला.
उत्तर प्रदेशात सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून इतर विरोधी पक्ष काहीच करत नाहीत. त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे आपल्यालाच सीएए आणि एनआरसीच्या विरोधात लढावे लागणार आहे. आम्ही कोणालाही घाबरणार नाही, असे सांगत प्रियंका गांधी यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीवर टीका केली.
#WATCH Man breaches security of Priyanka Gandhi Vadra at a party event in Lucknow on Congress foundation day, gets to meet her. pic.twitter.com/v4UtwedMF2
— ANI UP (@ANINewsUP) December 28, 2019
दिल्लीसह देशभरात सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना काँग्रेसने पाठिंबा जाहिर केला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यघटना वाचविण्याकरिता जनजागृती करण्यासाठी काँग्रेसने पक्षाच्या स्थापनादिनी देशभरात मोर्चे काढायचे ठरविले. या कायद्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी सध्या निदर्शने सुरू आहेत.