ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - बसपाच्या प्रमुख मायावतींचा भाऊ आणि बहुजन समाज पक्षाच्या बँक खात्यांमध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी इडीने दिल्लीतील युनियन बँकेच्या खात्यांच्या केलेल्या चौकशीत मायावतींचा भाऊ आनंद कुमार यांच्या खात्यात 1.43 कोटी आणि बसपाच्या खात्यात 104 कोटी रुपये जमा झाल्याचे उघड झाले. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या मायावतींसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
इडीने करोल बाग येथील युनियन बँकेच्या शाखेत केलेल्या नियमित तपासणीदरम्यान ही रक्कम उघडकीस आली आहे. ही रक्कम नोटाबंदीच्या निर्णयानंतर जमा करण्यात आल्याने या रकमेविषयी संशय बळावला आहे. मात्र या खात्यातील व्यवहाराबाबत चौकशी सुरू आहे. जमा झालेल्या रकमेचे स्त्रोत उघड झाल्यानंतर पुढील चौकशी होणार आहे. आनंद कुमार यांची या प्रकरणी चौकशी होणार की नाही याबाबत तपास झाल्यानंतर निर्णय होणार आहे. आनंद कुमार यांच्याविरोधात काही व्यवहारांबाबत याआधीपासूनच चौकशी सुरू आहे.
ED found Mayawati's brother's a/c in Union bank of India,Karol Bagh branch,Delhi wherein Rs1.43 cr was deposited post demonetisation-Sources— ANI (@ANI_news) 26 December 2016