- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : भाजपाविरोधी आघाडीची जुळवाजुळव सुरू असताना मायावतींनी काँग्रेसला सूचक इशारा दिल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मायावतींची भेट घेतली. या भेटीत विरोधकांच्या आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र काय असावे, याबाबत चर्चा झाली. चर्चेत मायावतींनी अतिशय समंजस दृष्टिकोन स्वीकारला, असे लोकमतशी बोलतांना पवारांनी सांगितले.विरोधी पक्षांची देश पातळीवर आघाडी अवघड पण राज्यवार आघाडीचे सूत्र जमवणे तुलनेने सोपे आहे. काँग्रेस ज्या राज्यात प्रमुख विरोधकाच्या भूमिकेत वा सत्तेवर आहे तिथे त्याने पुढाकार घ्यावा व अन्य विरोधी पक्षांना त्यांच्या गुणवत्ता व सोयीनुसार त्याने सामावून घ्यावे. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यादव यांच्या बसप व सपाची आघाडी मजबूत आहे. तिथे काँग्रेस व रालोद या पक्षांना दोघांनी सहभागी करून घ्यावे, असे मत चर्चेत व्यक्त झाले.तसेच बंगालमधे तृणमूल व डावे दोघेही भाजपाच्या विरोधात आहेत. तिथे काँग्रेसने नेमके कोणाबरोबर जावे हा मोठा तिढा आहे. तो प्रश्न काँग्रेसने सोडवावा. केरळात काँग्रेस व डाव्या पक्षांमधे थेट लढत आहे. तिथे दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने तडजोड अवघड आहे.पवारांनी दिला सल्लातामिळनाडूत द्रमुक, आंध्रात चंद्राबाबू नायडू व तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा लागेल. सत्तेतून भाजपचे उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक राज्यात लोकसभेची प्रत्येक जागा महत्त्वाची ठरणार आहे.त्यासाठी स्थानिक स्तरावर चर्चा करून निर्णय घेणे, अधिक उचित ठरेल असे पवारांनी मायावतींना सुचवले.
विरोधी आघाडीबाबत मायावती समंजस- शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 1:23 AM