मुंबई - देशातील संसदेचे ५ दिवसीय विशेष अधिवेशन मोदी सरकारकडून बोलवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. नुकतेच संसदेचे अधिवेशन संपले होते. त्यानंतर आता १८ ते २२ सप्टेंबर या काळात केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात ५ सत्र होणार आहेत. त्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या मनात कदाचित भीती असेल, म्हणून त्यांनी विशेष अधिवेशन बोलावल्याचं राहुल गांधींनी म्हटलं.
केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती समोर आली आहे. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन यावर चर्चा सुरू आहे. यावर्षीच्या सुरुवातीला लॉ कमिशनने राजकीय पक्षांकडून ६ प्रश्नांची उत्तरे मागितली होती. सरकार हे विधेयक मंजूर करण्याच्या मानसिकतेत आहे, तर राजकीय पक्ष त्याचा विरोध करत आहेत. त्यामुळे, आता मोदी सरकारच्या विशेष अधिवेशनावरुन चर्चा होत आहे. त्यातच, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आलेल्या खासदार राहुल गांधींना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी अदानींचा उल्लेख करत स्पष्टपणे उत्तर दिले.
मला वाटते की, कदाचित मोदींच्या मनात थोडीशी भीती असेल, त्याप्रकारची भीती जेव्हा मी संसेदत भाषण केल्यानंतर त्यांना वाटली होती. त्या भीतीमुळेच, माझी खासदारकी रद्द करण्यात आली. म्हणूनच, मला वाटते की ही भीतीची बाब आहे. कारण, हे सर्व प्रकरण पंतप्रधानांच्या जवळचे आहेत. जेव्हा तुम्ही अदानींचे प्रकरण काढता तेव्हा पंतप्रधान असह्य आणि घाबरतात, असे उत्तर राहुल गांधींनी संसदेच्या विशेष अधिवेशनासंदर्भात दिले.
राहुल गांधींचा अदानींवर निशाणा
विरोधकांच्या INDIA आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेतली, यात त्यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यातील कथिक संबंधांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी परदेशी वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्यांचा दाखलाही दिला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, G-20 परिषद देशासाठी महत्त्वाची आहे, मात्र देशात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. गौतम अदानीबाबत आज काही खुलासे झाले आहेत, त्यामुळे देशाच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. देशाबाहेर पैसा पाठवला जातोय, हा पैसा नेमका कोणाचा आहे? काही वृत्तपत्रांनी अत्यंत गंभीर खुलासे केले आहेत. वृत्तपत्र दाखवत राहुल गांधी म्हणाले की, हा पैसा कोणाचा, अदानींचा की दुसऱ्याचा?