ह्युमन रिसोर्समध्ये एमबीए पूर्ण केल्यानंतर फातिमा नावाच्या तरुणीने नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वत:वर विश्वास सिद्ध करून दाखवला. स्कूटीवर फूड स्टॉल लावून ती तिच्या ग्राहकांना घरचे स्वादिष्ट पदार्थ देते. 'एमबीए फूड वाली' नावाचा तिचा स्टॉल पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे आहे. आता तो भारतभर चर्चेचा विषय बनला आहे. ती इतरांना त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करते.
30 वर्षीय फातिमाने 2011 मध्ये एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केला. दोन वर्षांपूर्वी ती तिच्या पतीसोबत सिलीगुडीला शिफ्ट झाली आणि सध्या मातीगारा येथे राहते. अलीकडेच त्यांनी सिलीगुडीच्या बागजतीन पार्कमध्ये स्कूटीवर फूड स्टॉल लावला, जो दररोज संध्याकाळी 7 ते 10.30 या वेळेत चालतो.
फातिमा स्वतः घरी अन्न बनवते, ज्यामध्ये खीर, दही वडा आणि पाणीपुरी, शेवपुरी अशा चाटचा समावेश होतो. मागणीनुसार फातिमाचा मेनू बदलतो. स्वयंपाक करण्यापासून ते विक्रीपर्यंत व्यवसायातील सर्व बाबी ती एकट्याने हाताळते. दहीवड्याची किंमत 25 रुपये, पाणीपुरी, शेवपुरी चाट 25 रुपये आणि खीर 20 रुपये आहे.
फातिमा दररोज सुमारे 500 रुपये कमवते. फातिमाने कठोर परिश्रमाने आपला व्यवसाय वाढवला आणि आता ती लोकांना प्रेरणा देत आहे. फूड स्टॉलद्वारे, फातिमाने केवळ स्वतःसाठी कमाईचा स्रोत निर्माण केला नाही तर ती तिच्या आजूबाजूच्या लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"