ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - दिल्ली महानगरपालिका निवडणुकांतील मतदान झालेल्या 270 जागांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिल्ली या तिन्ही महानगरपालिका निवडणुकांच्या आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजपा आघाडीवर आहे.
270 जागांपैकी 150 हून अधिक जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर दिल्लीत सत्तेत असलेल्या अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी पिछाडीवर आहे. निवडणुकांच्या या लढाईत "आप" तिस-या क्रमांकावर आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकांचे निकाल येण्याआधीच म्हटले होते की, "एक्झिट पोलनुसार भाजपाला बहुमत मिळाल्यास मोठे आंदोलन छेडणार. जर आमचा पराभव झाला तर हे सिद्ध होईल की, पंजाब, उत्तर प्रदेश, मुंबई, भिंड आणि धोलपूरमध्ये ईव्हीएमसोबत छेडछाड झाली आहे. आमचा जन्म आंदोलनामुळे झाला आहे. आम्हाला सत्ता उपभोगायची नाही. त्यामुळे याविरोधात आम्ही आंदोलन छेडू".
तर दुसरीकडे निकालाचे कल पाहता दिल्लीत कमळ फुलणार असल्याचं दिसतं आहे. यावर भाजपानं केजरीवाल यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतील भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत ट्विट केले आहे. "केजरीवालजी यांनी सांगितले होते की हरलो तर विटेनं विट वाजवू. पराभव तर निश्चित आहे यामुळे त्यांच्यासाठी दोन विटा भेटस्वरुपात पाठवल्या आहेत. घरी बसून त्या वाजवाव्यात."असं ट्विट बग्गा यांनी केले आहे.
दरम्यान, हाती आलेल्या कलानुसार भाजपा क्रमांक एक, काँग्रेस दुस-या क्रमांकावर तर आम आदमी पार्टी तिस-या क्रमांकावर आहे.
या निवडणुकांमध्ये भाजपाला 235 जागा जिंकण्याचं यश मिळेल, असा दावा दिल्लीतील भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केला होता. दरम्यान, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी तिवारी यांनी देवाची पूजा-आरती केली.
केजरीवाल जी ने कहा है जी अगर हार गए तो ईंट से ईंट बजा देंगे।हार तो उनकी निश्चित है इसलिए मैंने उपहार मे 2 ईंट भेजदी है,घर बैठ कर बजाते रहे pic.twitter.com/NHcm8a6f5b— Tajinder Pal S Bagga (@TajinderBagga) April 25, 2017