ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - दिल्लीच्या जनतेने दिलेला कौल खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याऐवजी आम आदमी पार्टीने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर पराभवाचे खापर फोडले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्यामुळे पराभव झाल्याचे आपने म्हटले आहे. दिल्लीत भाजपाने केलेली कामगिरी अविश्वसनीय आहे. भाजपा आणि आपला मिळालेल्या जागांमध्ये मोठी तफावत आहे. भाजपाने ईव्हीएममशीनमध्ये छेडछाड केल्यामुळे त्यांना इतका मोठा विजय मिळवता आला असा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी केला आहे.
ज्या भाजपाने ईव्हीएम मशीन्सच्या छेडछाडीसंबंधी पुस्तके लिहीली, न्यायालयात खटले दाखल केले तीच भाजपा आता ईव्हीएमचे समर्थन करत आहे. लोकशाहीला वाचवण्यासाठी भविष्यात ईव्हीएमविरोधात आंदोलन छेडावे लागेल असे सिसोदीया म्हणाले. दरम्यान आपचे दुसरे नेते गोपाल राय यांनी सुद्धा असाच आरोप केला आहे. ही मोदी लाट नसून इव्हीएम लाट असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोपाल राय यांनी हा आरोप केला. दशकभरापासून दिल्लीचे रस्ते स्वच्छ झालेले नाहीत पण एमसीडीमध्ये भाजपाने क्लीनस्वीप केले. जेव्हा मशीन तुमच्यासोबत असते तेव्हा माणसाचे महत्व नगण्य होऊन जाते असे टि्वट दिल्ली सरकारचे प्रसारमाध्यम सल्लागार नागेंद्र शर्मा यांनी केले आहे.
दिल्ली महापालिकेत एकूण 272 जागा असून, भाजपा 180, काँग्रेस 35, आप 45 आणि अन्य 10 जागांवर आघाडीवर आहेत. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. तिन्ही मनपामध्ये (दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली, उत्तर दिल्ली) भाजपानं बहुमताचा आकडा पार केला आहे. मतमोजणीचे सुरुवातीचे कल पाहता पहिल्या तासाभरात भाजपानं काँग्रेस आणि "आप"ला बरंच मागे सोडत निर्णायक आघाडी मिळवली.