Delhi MCD Results 2022:दिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणुकीत आम आदमी पक्षाने (AAP) भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथून लावली आहे. या विजयामुळे देशभरातील आप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा करताना भाजप खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांच्या 'रिंकिया के पापा' गाण्यावर जोरदार नाच केला.
दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल बुधवारी (7 डिसेंबर) जाहीर झाले असून, त्यात आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे. एमसीडीमध्ये 250 पैकी 134 जागा 'आप'ने जिंकल्या आहेत तर भाजपने 104 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 9 तर अपक्ष उमेदवारांनी 3 जागा जिंकल्या. गेल्या 15 वर्षांपासून एमसीडीवर सत्ता गाजवणाऱ्या भाजपला आम आदमी पार्टीने पराभवाची धुळ चारली आहे. अशा परिस्थितीत दिल्लीच नाही तर अनेक राज्यांतील आप कार्यकर्त्यांनी हा विजय साजरा केला.
मनोज तिवारीच्या गाण्यावर डान्स
उत्तर प्रदेशमध्ये दिल्लीतील भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या 'रिंकिया के पापा' या हिट गाण्यावर आप कार्यकर्त्यांनी जोरदार डान्स केला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओही समोर आला आहे. आम आदमी पार्टीच्या उत्तर प्रदेश युनिटने भाजपची खिल्ली उडवणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये आम आदमी पार्टीच्या टोप्या घातलेले कार्यकर्ते 'रिंकिया के पापा'वर नाचताना दिसत आहेत.
विजयानंतर केजरीवाल काय म्हणाले?एमसीडी निवडणुकीतील विजयानंतर आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय मार्गावरील आप मुख्यालयात पोहोचले. येथे आपल्या भाषणात मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, आपल्या सर्वांना दिल्लीची स्थिती सुधारायची आहे. यासाठी मला भाजप आणि काँग्रेससह सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. विशेषत: केंद्र आणि पंतप्रधानांच्या मदतीची आणि आशीर्वादाची गरज असल्याचे केजरीवाल यावेळी म्हणाले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही उपस्थित होते.