नवी दिल्ली - फास्ट फूड कंपनी मॅकडोनाल्डच्या बर्गरमध्ये पाच वर्षांपूर्वी अळ्या सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मॅकडोनाल्डला या प्रकरणी संबंधित ग्राहकाला 70 हजार रुपये भरपाई द्यावी लागणार आहे. दिल्लीमधील मॅकडोनाल्डमध्ये पाच वर्षापूर्वी एका ग्राहकाला बर्गरमध्ये अळ्या सापडल्या होत्या. तसेच यामुळे तो ग्राहक आजारी पडला होता. त्यानंतर आता जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल कायम ठेवत दिल्लीच्या राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ग्राहकाला भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप सक्सेना असं बर्गरमध्ये अळ्या सापडलेल्या ग्राहकाचं नाव असून ते पूर्व दिल्लीमध्ये राहतात. 10 जुलै 2014 रोजी नोएडातील जीआयपी मॉलमधील मॅकडोनाल्डमध्ये संदीप गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथे खाण्यासाठी बर्गर विकत घेतला होता. बर्गर खाल्ल्यानंतर काहीवेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी लगेचच बर्गरमध्ये पाहिलं असता त्यांना अळ्या सापडल्या. मात्र थोडा बर्गर संदीप यांनी त्याआधीच खाल्ला होता. त्यामुळे त्यांना उलटीचा त्रास सुरू झाला.
संदीप सक्सेना या प्रकारानंतर तातडीने स्टोर मॅनेजरला भेटले. त्यांनी मॅनेजरला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि पोलिसांनाही याबाबत माहिती दिली. तसेच फूड इन्स्पेक्टरना बोलावण्यात आलं. प्रकृती बिघडल्याने संदीप यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बर्गर खाण्यासाठी योग्य नसून, त्यामध्ये अळ्या असल्याचे आढळून आले होते असा अहवाल फूड इन्स्पेक्टरनी दिला होता. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने घेतली होती. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मॅकडोनाल्डला आता संदीप यांना 70 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. यामध्ये 895 रुपये उपचारासाठी लागलेला खर्च, मानसिक त्रास झाला त्यासाठी 50 हजार रुपये आणि खटल्यासाठी 20 हजार रुपये अशा खर्चाचा समावेश आहे. 60 दिवसांच्या आतमध्ये भरपाई न दिल्यास 9 टक्के व्याज द्यावं लागेल असे ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आदेशात म्हटले आहे. बर्गरमध्ये अळ्या सापडणं मॅकडोनाल्डला आता पाच वर्षांनी चांगलचं महागात पडलं आहे.