जम्मू – मी आणि माझं कुटुंब काश्मीरी पंडित आहे. जेव्हा कधीही जम्मू काश्मीरला येतो तेव्हा स्वत:च्या घरी आल्यासारखं वाटतं असं विधान काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काश्मीरी पंडितांना आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिले. जम्मूमधील कार्यकर्त्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला.
गुरुवारी रात्री राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी कटरा येथे माता वैष्णवी देवीचे दर्शन घेतले त्यानंतर ते रात्री तिथेच मुक्कामाला होते. जम्मू काश्मीरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा कधीही मी जम्मू काश्मीरला येतो तर मला असं वाटतं मी माझ्याच घरी आलो आहे. हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. काल मी वैष्णवी देवीचं दर्शन घेतले आणि मला वाटलं की, मी घरी आलोय, माझंही कुटुंब काश्मीरी पंडित आहे. त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे मी जे काही बोलेन ते खोटं नसेल. माझे जे भाऊ काश्मीरी पंडित आहे त्यांची मी मदत करेन असं आश्वासन राहुल यांनी दिलं.
राहुल गांधी गुरुवारी जम्मू काश्मीर इथं पोहचले. त्यावेळी त्यांनी रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा डोंगरावरील माता वैष्णवी देवीचं दर्शन घेऊन तिथे पूजा केली. जम्मू विमानतळावर माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे स्वागत स्थानिक कार्यकर्त्यांनी केले. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राहुल गांधी यांचा कुठलाही राजकीय कार्यक्रम नव्हता. शुक्रवारी सकाळी ११ ते साडेबारा पर्यंत राहुल गांधींनी हॉटेलमध्येच कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेतल्या.
शरद पवारांनी केली होती काँग्रेसवर टीका
एका मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय. असं असलं तरी काँग्रेस आजही रिलेवन्स असलेला पक्ष आहे. देशभर पसरलेला पक्ष आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ असल्यामुळेच युपीएसारखा प्रयोग झाला. पण आज काँग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेत असं पवार म्हणाले होते.