‘इंदिरा गांधी पंतप्रधान होताच माझ्या वडिलांना पदावरुन काढलं', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 05:18 PM2023-02-21T17:18:46+5:302023-02-21T17:30:00+5:30
MEA S Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वडील तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये ब्युरोक्रॅट होते.
MEA S Jaishankar : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indhira Gandhi) यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. इंदिरा गांधींनी त्यांच्या वडिलांना पदावरुन हटवले, असे जयशंकर म्हणाले. ते म्हणाले की, 'माझे वडील ज्येष्ठ नोकरशहा(ब्युरोक्रॅट) होते, नंतर ते सचिव झाले. पण, इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांना पदावरुन हटवण्यात आले.
जयशंकर यांनी त्यांच्या प्रवासाविषयी माहिती दिली. नोकरशाहीतून राजकारणात कसे आलो, हे त्यांनी सांगितले. जयशंकर हे जानेवारी 2015 ते जानेवारी 2018 पर्यंत परराष्ट्र सचिव होते, त्यापूर्वी त्यांनी चीन आणि अमेरिकेसह महत्त्वाच्या देशांमध्ये राजदूत म्हणून काम केले होते. 2019 मध्ये मोदी सरकार सत्तेत परतल्यावर पंतप्रधान मोदींनी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आणि त्यांना परराष्ट्र मंत्री केले.
जयशंकर यांचे वडील के सुब्रह्मण्यम हे भारतातील आघाडीच्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीतीकारांपैकी एक मानले जातात. 2011 मध्ये त्यांचे निधन झाले. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वडिलांबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, 1979 मध्ये त्यावेळच्या जनता सरकारमध्ये ते सर्वात तरुण सचिव झाले. 1980 मध्ये ते संरक्षण उत्पादन सचिव होते. 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा निवडून आल्या, तेव्हा त्यांनी काढून टाकलेले पहिले सचिव माझे पडील होते. नोकरशाहीत त्यांना त्यांची कारकीर्द ठप्प झालेली दिसली. राजीव गांधींच्या काळातही त्यांना दडपण्याचे काम झाले, अशी माहिती जयशंकर यांनी दिली.
मोठा भाऊ सचिव झाला तेव्हा...
जयशंकर पुढे म्हणाले की, त्यांचे वडील खूप प्रामाणिक व्यक्ती होते, कदाचित यामुळे समस्या उद्भवली असेल. नोकरशाहीत त्यांना त्यांची कारकीर्द रखडलेली दिसली. त्यानंतर ते पुन्हा सचिव झाले नाहीत. राजीव गांधींच्या काळात त्यांच्या जागी एका कनिष्ठ व्यक्तीला कॅबिनेट सचिव बनवण्यात आले होते. आम्ही क्वचितच याबद्दल बोललो. म्हणूनच माझा मोठा भाऊ जेव्हा सेक्रेटरी झाला तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटला.
चीनमध्ये पहिल्यांदाच मोदींची भेट घेतली
मोदी सरकारमध्ये मंत्री झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी मला मंत्रिमंडळात सामील होण्यास सांगितले. 2011 मध्ये माझी त्यांच्याशी चीनमध्ये पहिली भेट झाली होती. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ते तिथे आले होते. खरे सांगायचे तर त्यांनी माझ्यावर खूप मोठा प्रभाव पाडला. 2011 पर्यंत मी अनेक मुख्यमंत्र्यांना येताना पाहिले होते, पण त्यांच्यापेक्षा जास्त तयारी करुन कोणी आलेले नाही.