भारत रशियाकडून स्वस्त तेल घेणार का? मोदी सरकारच्या उत्तरानं सारेच पडले कोड्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 08:58 PM2022-03-17T20:58:40+5:302022-03-17T21:03:47+5:30
भारत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करणार असल्याची चर्चा असताना मोदी सरकारनं मांडली भूमिका
नवी दिल्ली: युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू असल्यानं खनिज तेलाचे दर गगनाला भिडले. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या. त्या पार्श्वभूमीवर रशियानं भारताला स्वस्तात तेल खरेदी करण्याची ऑफर दिली. रशियावर अमेरिकेसह अनेक युरोपियन देशांनी निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियादेखील बाजारपेठेच्या शोधात आहेत. रशियाकडून देण्यात आलेल्या ऑफरबद्दल भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं भूमिका स्पष्ट केली आहे.
भारताला खनिज तेलाची गरज भागवण्यासाठी आयात करावी लागते. भारत नेहमीच जागतिक उर्जा बाजारात शक्यता शोधत आला आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार का, असा प्रश्न परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांना विचारण्यात आला. त्यावर भारत कायम नवे पर्याय शोधत आल्याचं उत्तर बागची यांनी दिलं.
भारत आपल्या खनिज तेलाची बहुतांश गरज आयातीच्या मार्गानं भागवतो. त्यामुळे आपण कायमच जागतिक ऊर्जा बाजारातील सर्व शक्यता शोधत असतो. रशिया मोठा पुरवठादार आहे असं मला वाटत नाही, असं बागची म्हणाले. भारत आणि रशिया तेल खरेदीसाठी चर्चा करत असल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं होतं. त्यावर बागची यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
रशियानं युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियाविरोधात कठोर भूमिका घेतली. त्याचा आर्थिक फटका रशियाला बसत आहे. अनेक देशांनी तेलखरेदी बंद केल्यानं रशियन तेलाला फारशी मागणी नाही. त्यामुळेच रशियानं भारताला स्वस्तात तेल खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.