नवी दिल्ली - देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अशातच होळी 2022 साजरी करण्याआधी, मोदी सरकारने देशभरातील नागरिकांना त्यांच्या आईसह जेवणाचा आस्वाद घेऊन रंगांचा सण साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. सरकारने नागरिकांना विनंती केली आहे की त्यांनी #MaaKeSangKhana किंवा #MealWithMom वापरून त्यांच्या आईसह जेवणाचा आस्वाद घेतानाचे खास फोटो शेअर करावेत. यातील काही निवडक फोटो सरकार त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करेल.
भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधून जाऊन आईची भेट घेतली होती. दोन वर्षांनंतर मोदी आई हिराबेन यांच्या भेटीसाठी पोहोचले. याआधी ऑक्टोबर 2019 मध्ये मोदींनी आईंची भेट घेतली होती. यानंतर मोदी सातत्यानं व्यग्र होते. त्यामुळे त्यांना आईची भेट घेता आली नाही. पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर मोदी गुजरातमध्ये पोहोचले. गुजरातच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. मोदी आईसोबत जेवले. याआधीही मोदींनी जेव्हा जेव्हा आईची भेट घेतली, तेव्हा तेव्हा त्यांचे फोटो व्हायरल झाले. यानंतर आता मोदी सरकारने आईसोबत जेवणाचा आस्वाद घेऊन सणाचा आनंद द्विगुणित करा असं म्हटलं आहे.