कोटा : राजस्थानातील कोचिंग सेंटर असलेल्या कोटामध्ये नीटसह इतर परीक्षांच्या अभ्यासासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत असल्याने पालकांसह राज्य सरकारही चिंतेत आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार हॉस्टेलमधील वॉर्डन आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. वॉर्डन आणि कर्मचाऱ्यांना रोजच्या जेवणाचे नियोजन, मानसिक, वर्तणूक समुपदेशन आणि विद्यार्थ्यांच्या काळजीशी संबंधित इतर बाबींचे प्रशिक्षण दिले जाईल.
वॉर्डन आणि कर्मचाऱ्यांना विशेष वसतिगृह व्यवस्थापन कौशल्य मिळावे, यासाठी येथील जय मिनेश आदिवासी विद्यापीठाशी करार करण्यात आला आहे. जेईई आणि नीट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी दरवर्षी २.५ लाखांहून अधिक विद्यार्थी कोटा येथे येतात.कोटा हॉस्टेल असोसिएशनचे अध्यक्ष नवीन मित्तल म्हणाले की, कोटामध्ये ३,५०० हॉस्टेल आहेत.
२३ विद्यार्थ्यांनी यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक आत्महत्या केल्या आहेत.२७ ऑगस्टला अवघ्या काही तासांतच दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती.१३ सप्टेंबर रोजीही एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. १५ आत्महत्येच्या घटना गेल्या वर्षी घडल्या होत्या.
तणाव आणि नैराश्याच्या लक्षणांवर लक्ष ठेवणारप्रशिक्षण कार्यक्रमाबाबत मित्तल यांनी सांगितले की, कठीण काळात कठोर पावले उचलावी लागतात. हॉस्टेल वॉर्डन नियुक्त करतात. पण, त्यांना विद्यार्थ्यांशी संवाद कसा साधावा, यासाठी पुरेसे प्रशिक्षण दिले जात नाही. वॉर्डनला विद्यार्थ्यांशी नेमके कसे वागावे, कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये तणाव आणि नैराश्यातील लक्षणांवर लक्ष ठेवण्यासाठी हे प्रशिक्षण मदत करेल.