हैदराबाद: मक्का मशिदीतील बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश रवींदर रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे. रेड्डी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना आपला राजीनामा पाठवला. वैयक्तिक कारणांसाठी आपण राजीनामा देत असल्याचे रेड्डी यांनी राजीनामापत्रात नमूद केले आहे. रेड्डी यांच्या या निर्णयामुळे आता एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.न्या. रेड्डी यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. न्या. रवींदर रेड्डी यांनी दिलेल्या निकालामुळे मी अचंबित झालो असून त्यांचा राजीनामा देण्याचा निर्णय विचित्र असल्याचे एमआयएम पक्षाचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.मक्का मशिदीत झालेल्या स्फोट प्रकरणात तब्बल 11 वर्षानंतर सोमवारी न्यायालयाने अंतिम निकाल दिला. यावेळी न्यायालयाने स्वामी असीमानंद आणि इतर पाच जणांना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले. २००७च्या मे महिन्यात मक्का मशिदीत झालेल्या स्फोटात ९ जण ठार तर ५८ जखमी झाले होते. या प्रकरणी दहा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांना अटक करून त्यांच्यावर खटला भरण्यात आला होता. या निकालामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठा धक्का बसला. आरोपी देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, स्वामी असीमानंद उर्फ नबा कुमार सरकार, भारत मोहनलाल रत्नेश्वर उर्फ भारत भाई आणि राजेंद्र चौधरी यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयानं निर्दोष सुटका केली आहे. या सर्वांना मक्का मशीद स्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती.
मक्का मशीद स्फोट प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर न्या. रवींदर रेड्डींचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 8:00 PM