नवी दिल्ली : एखादी यंत्रणा कशी काम करते, तिचे तसेच त्यातील यश व अपयश या बाबींचे सातत्याने परीक्षण व चिकित्सा व्हायला हवी, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्या. जस्ती चेलामेश्वर यांनी सोमवारी व्यक्त केले.न्या. चेलमेश्वर यांच्यासह चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या कार्यपद्धतीवर शरसंधान केल्याने खळबळ माजली होती. त्यानंतर चेलमेश्वर आज पहिल्यांदाच एखाद्या सार्वजनिक समारंभाला उपस्थित राहिले होते. तिथे ते काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.अमेरिकेतील केंटुकी विद्यापीठातील प्राध्यापक जॉर्ज गडबोइज यांनी लिहिलेल्या ‘सुप्रीम कोर्ट आॅफ इंडिया - द बिगिनिंग्ज' या पुस्तकाचे प्रकाशन न्या. चेलामेश्वर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी चेलमेश्वर म्हणाले की, न्याययंत्रणा निष्पक्ष व स्वतंत्र बाण्याची असेल तर लोकशाहीला कोणताही धोका निर्माण होत नाही. उदारमतवादी लोकशाहीचे अस्तित्व टिकून राहाण्यामध्ये निष्पक्ष न्याययंत्रणेचा मोलाचा वाटा असतो.भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाल्यानंतरच्या पहिल्या दोन दशकांत या न्यायालयात जे कामकाज झाले त्याचा बारकाईने अभ्यास करुन प्राध्यापक जॉर्ज गडबोइज यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या दोन दशकांतील कामकाजाच्या बळावरच सर्वोच्च न्यायालयातील न्यायदानात काही उत्तम पायंडे निर्माण झाले. देशातील कार्यरत यंत्रणांमध्ये जनतेच्या हितासाठी सुधारणा व्हायला पाहिजेत, असे ज्यांना वाटते त्यांनी या यंत्रणांच्या कार्यशैलीचा व यशापयशाचा अभ्यास केला पाहिजे.आब टिकून राहावीसर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक खटले वर्षानुवर्षे निकालाविना तुंबून राहातात. या प्रश्नावर काही प्रभावी तोडगा काढणे आवश्यक आहे, तरच सर्वोच्च न्यायालयाची उपयोगिता व आब टिकून राहील, असेही चेलमेश्वर म्हणाले. या समारंभाला न्या. मदन लोकूर हेही उपस्थित होते.
यंत्रणेची कार्यशैली, यशापयश यांची सातत्याने चिकित्सा हवी , न्या. चेलमेश्वर यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:03 AM