मुंबई - सरदार सरोवरातील पाण्याची पातळी वाढवण्यावरून नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सरदार सरोवरामधील पाण्याची पातळी मुदतीआधीच वाढवण्यात आली, असा आरोप मेधा पाटकर यांनी केला. सरदार सरोवर धरणातील पाण्याची पाकऴी वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयावरून टीका करताना त्या म्हणाल्या,"धरणाच्या बुडीत क्षेत्रामधील हजारो गावकरी पाण्याखाली जात असताना केवळ नरेंद्र मोदींसाठी धरणातील पाण्याचा पातळी वाढवली गेली. त्यामुळे मध्य प्रदेशातील धरण्याच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावांना फटका बसला आहे.'' सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावकऱ्यांचे अद्याप पूनर्वसन झालेले नाही. यावेळी धरणातील पाण्याची पातळी मुदतीआधीच वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस 17 सप्टेंबरला असतो म्हणूनच मुदतीआधी धरणातील पाणी पातळी वाढवली गेली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापितांना अद्याप मोबदला दिला गेलेला नाही, असा आरोपही पाटकर यांनी केला. मेधा पाटकर पुढे म्हणाल्या की, "गुजरात सरकारने सरदार सरोवरातील पाण्याची पातळी 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात येईल, असे सांगितले होते. पुढे ही तारीख 30 सप्टेंबर करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात मोदींच्या वाढदिवशीच 17 सप्टेंबर रोजी धरणातील पाण्याची पातळी वाढवली गेली. हजारो नागरिक धरणाच्या वाढत्या पाण्यात बुडत असताना केवळ एका व्यक्तीसाठी धरणातील पाणी वाढवले गेले. त्यामुळेच आम्ही आंदोलकांनी मोदींचा वाढदिवस धिक्कार दिवस म्हणून साजरा केला, असे मेधा पाटकर यांनी सांगितले.
हजारो लोक बुडत असताना एका व्यक्तीसाठी सरदार सरोवर भरले, मेधा पाटकर यांची मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 3:51 PM