नवी दिल्ली- देशाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आलं. या अभियानात प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. भाजपाकडून शनिवारी दिल्लीमध्ये ‘दीपावली मंगल मिलन’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते.
दिल्लीमध्ये शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. एक काळ असा होता की, पत्रकारांना शोधावं लागायचं पण आता मात्र प्रसारमाध्यमांच्या कक्षा रूंदावल्या आहेत. त्यामुळे पत्रकार मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. लोकशाहीसाठी ही बाब निश्चितच चांगली आहे. देशात सुधारणा कशा प्रकारे व्हायला हव्यात याबाबत पत्रकार सूचना देतात, राजकारण्यांनी नेमकं कोणत्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवं, हेदेखील पत्रकारांमुळे समजतं असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.प्रसारमाध्यमांनी ज्या प्रकारे स्वच्छ भारत अभियानाला प्रसिद्धी दिली त्यामुळेच अभियान यशस्वी झालं, असं म्हणत मोदींनी प्रसारमाध्यमांचं कौतुक केलं आहे. प्रसारमाध्यमांमुळे अभियान घरोघरी पोहचलं, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं.
या कार्यक्रमाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, स्मृती इराणी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. दीपावली मिलन महोत्सवाची सांगता झाल्यावर अनेक पत्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. आपल्या भाषणानंतर मोदींनी अनेक पत्रकारांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढले.