नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जागेच्या मालकीचा वाद कटुता न येता मिटावा यासाठी पुन्हा बोलणी सुरू करावी म्हणून हिंदू आणि मुस्लिम गटाने अयोध्या मध्यस्थी समितीशी संपर्क साधला आहे. यानंतर समितीने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी छोटे निवेदन सादर केले.या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही पक्षांनी अयोध्या वादाच्या अपिलांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असली तरी मध्यस्थी सुरू राहू शकते, असे सुचवले आहे.हिंदू आणि मुस्लिमांतील काही गटांनी विरोध केल्यामुळे इतर हितसंबंधितांत असूया निर्माण झाली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे अयोध्या अपिलांवर सुनावणी सुरू आहे. दोन आॅगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत या खंडपीठाने आम्ही अंतिम तोडग्यावर पोहोचू शकलो नाही, असे जाहीर केले होते.मध्यस्थीमुळे अनिश्चित अवस्थेत ठेवल्या गेलेल्या अपिलांवर सहा आॅगस्टपासून निवाडे सुरू झाले असून, आतापर्यंत २० पेक्षा जास्त सुनावण्या झाल्याही आहेत. पाच सदस्यांच्या खंडपीठासमोर अपिलांवर रोजच्या रोज सुनावणी सुरू आहे. सुन्नी वक्फ बोर्ड न्यायालयात युक्तिवाद करीत आहे.>सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्वाणी आखाड्याने गेल्या ७० वर्षांपासून हिंदू आणि मुस्लिमांत जागेच्या मालकीवरून सुरू असलेला हा वाद सलोख्याने सुटावा यासाठी चर्चा सुरूच ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, याला सूत्रांनी दुजोरा दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एफ. एम. आय. खलिफुल्ला, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि वरिष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा समावेश असलेल्या मध्यस्थ यंत्रणेला हिंदू व मुस्लिम पक्षांनी ही चर्चा गेल्या २९ जुलै रोजी ज्या मुद्यावर अचानक बंद पडली तेथून ती पुन्हा सुरू करावी, असे सुचवले आहे.
अयोध्या प्रकरणात पुन्हा मध्यस्थी?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 5:04 AM