हैदराबाद : मक्का मशिदीत झालेल्या स्फोट प्रकरणात 11 वर्षानंतर न्यायालयानं निकाल दिला. या स्फोटाप्रकरणी अटकेत असलेल्या स्वामी असीमानंद आणि इतर पाच जणांची सुटका करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयानं हा निकाल दिला. सबळ पुराव्याअभावी न्यायालयानं प्रकरणातील सर्व आरोपींची सुटका केली. स्वामी असीमानंद हे या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक होते.
11 मे 2007 रोजी मक्का मशिदीत झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला होता, तर 58 जण जखमी झाले होते. यानंतर आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काहीजणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात 10 पैकी 8 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. मात्र या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. आरोपी देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, स्वामी असीमानंद उर्फ नबा कुमार सरकार, भारत मोहनलाल रत्नेश्वर उर्फ भारत भाई आणि राजेंद्र चौधरी यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयानं निर्दोष सुटका केली आहे. या सर्वांना मक्का मशीद स्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती.