ऑनलाइन लोकमतबिहार, दि. 29 - 16 जुलै 2013ला सारण जिल्ह्यातील गंडामन गावात माध्यान्ह भोजन आहारातून विषबाधा होऊन 23 मुलांचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत तत्कालीन शाळेच्या मुख्याध्यापिका मीना देवी हिला कोर्टानं 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र तिचा पती अर्जुन राय याची सर्व आरोपीतून कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी सुनावणीसाठी जवळपास 40 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्यात दोन जेवण बनवणारे व्यक्ती, 22 ग्रामीण व्यक्ती, 9 डॉक्टर तसेत एसआयटीच्या 7 अधिका-यांची साक्ष घेण्यात आली. अखेर सर्व साक्षी पुराव्यांनंतर मुख्याध्यापिका मीना देवी हिला कोर्टानं 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
बिहारमधल्या सारण जिल्ह्यातल्या छपरापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या गंडामन गावातल्या सरकारी शाळेत माध्यान्ह भोजनात मुलांना डाळ, भात आणि सोयाबिनची भाजी खाण्यासाठी देण्यात आली होती. सोयाबिनची भाजी खाल्ल्यानं मुलांना उलट्या आणि मळमळचा त्रास जाणवू लागला. लगेचच आजारी पडल्यानं त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र मुलांची स्थिती फारच गंभीर झाल्यानं त्यांना पटनाच्या पीएमसीएच या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. उपचारादरम्यान 21 मुलांसह जेवण बनवणा-या महिलेचाही मृत्यू झाला.
विशेष म्हणजे या दुर्घटनेत जेवण बनवणा-या महिलेच्या दोन मुलांचाही मृत्यू ओढवला होता. त्यामुळे एकूण 23 मुलांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर जेवणात विष असल्याचं स्पष्ट झालं होतं.