ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 19 - काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. मीरा कुमार या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमधल्या एक आहेत. त्यांनी बिहार राज्यातून लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात मीरा कुमार यांनी लोकसभेचं अध्यक्षपदही भूषवलं आहे. लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांची 3 जून 2009 रोजी बिनविरोध निवड झाली होती. मीरा कुमार दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्या माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या आहेत. मीरा कुमार या 1973मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाल्या. त्यांनी अनेक देशांची भ्रमंती केली आहे. त्यांच्या मातोश्री या स्वातंत्र्य सेनानी होत्या. लोकसभेवर त्या पाच वेळा निवडून गेल्या आहेत. त्या पेशानं एक वकील आणि मुत्सद्दी राजकारणी असून, 8व्या, 11व्या, 12व्या, 14व्या आणि 15व्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रीपदही भूषवलं आहे
यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी ?
By admin | Published: June 19, 2017 4:23 PM
काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली
तत्पूर्वी राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामनाथ कोविंद सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर केलं. भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीत रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. एनडीएच्या सर्व घटकपक्षांना ही माहिती देण्यात आल्याचं अमित शहा यांनी सांगितलं आहे. रामनाथ कोविंद 23 जूनला उमेदवारी अर्ज भरतील. "रामनाथ कोविंद मूळ उत्तप्रदेशमधील कानपूरचे असून दलित प्रवर्गातले आहेत. संघर्ष करुन रामनाथ कोविंद आज या पदापर्यंत पोहोचले आहेत. रामनाथ कोविंद 12 वर्ष राज्यसभा सदस्य होते. उत्तर प्रदेशचे महासचिवदेखील होते". अशी माहिती अमित शहा यांनी दिली आहे. "नाव ठरण्याआधी आम्ही देशातील सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. नाव ठरल्यानंतर एनडीएतील सर्व घटकपक्षांना कळवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याशी बातचीत करत नाव कळवलं", असल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे.