उत्तर प्रदेशातील मेरठ लोकसभा जागेसाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे रामायणात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. अरुण गोविल हे सध्या प्रचारात व्यस्त आहेत. याच दरम्यान, अरुण गोविल यांचं एक विधान समोर आलं आहे, ज्यामध्ये ते एकदा खासदार बनले की मग इथल्या अडचणी काय आहेत ते बघू, असं म्हणताना दिसत आहेत.
मेरठ लोकसभा जागेच्या समस्यांबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अरुण गोविल म्हणाले की, "इथल्या समस्या काय आहेत हे एकदा शोधून काढावं लागेल... आता सगळ्यात आधी निवडणूक लढवायची आहे... एकदा तुम्ही मला या भागातून खासदार म्हणून निवडून द्या, मग या ठिकाणी काय काय काम आहे?, काय काय समस्या आहेत? त्यानुसार काम केलं जाईल."
अरुण गोविल यांनी 2021 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता भाजपाने त्यांना मेरठ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अरुण गोविल हे भाजपाचा लोकप्रिय चेहरा आहे, आजही मोठ्या संख्येने लोक त्यांना प्रभू रामाची भूमिका केल्यामुळे ओळखतात.
अरुण गोविल यांना उमेदवारी देऊन या भागात आनंदाचे वातावरण निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे समाजवादी पक्षाने या जागेवरून माजी महापौर सुनीता वर्मा यांना तिकीट दिलं आहे. अरुण गोविल यांच्या विरोधात उमेदवार उभा करताना सपा बराच गोंधळलेला दिसला. सपाने येथून तीनदा उमेदवार बदलले.
अखिलेश यादव यांनी सर्वात आधी मेरठमधून अधिवक्ता भानू प्रताप सिंह यांना तिकीट दिले होते, त्यानंतर त्यांचे तिकीट कापून अतुल प्रधान यांना उमेदवार करण्यात आले आणि शेवटच्या क्षणी त्यांचेही तिकीट कापण्यात आले आणि तिसरे म्हणजे सुनीता वर्मा यांना तिकीट देण्यात आले. आता मेरठच्या जागेवर अरुण गोविल आणि सुनीता वर्मा यांच्यात लढत होणार आहे.