गरीब मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी सरकारने अनेक शाळा उघडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली जाते. पण अनेक शिक्षक नोकरी मिळताच आपले खरे रंग दाखवू लागतात. शाळेत वेळेवर न येणं, सुटी घेऊन सरकारी नोकरीचा फायदा घेणं. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका शिक्षिकेला मेरठच्या मूलभूत शिक्षणाधिकारी आशा चौधरी यांनी निलंबित केलं होतं.
मेरठमधील परीक्षितगड येथील एका प्राथमिक शाळेत ही घटना घडली. येथे एका शिक्षिकेने नियुक्ती झाल्यानंतर शाळेत येणं बंद केलं. शिक्षिक २९२० पैकी केवळ ७५९ दिवस शाळेत आली आहे. मात्र तरीही शिक्षिकेच्या खात्यात सातत्याने पगार जमा होत होता. तपासणी केली असता शिक्षिकेचीची उपस्थिती सतत वाढत असल्याचं दिसून आलं. या कारणामुळे तिचा पगार जमा होत होता. याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे.
तपासानंतर सत्य आलं बाहेर
शिक्षिका सुजाता यादव बराच दिवसांपासून शाळेत आली नव्हती. तिच्या अनुपस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत होता. रजेचे अर्ज वारंवार मंजूर होत असताना ही बाब निदर्शनास आली. शिक्षिकेचे हजेरी रजिस्टर तपासले असता शाळेत येत नसतानाही उपस्थिती असल्याचं दिसून आलं. यानंतर चौकशी समिती बसली असता या प्रकरणी शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं. तिच्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक धरम सिंह हे देखील होते.
शिक्षिका आणि मुख्याध्यापक निलंबित
शिक्षिका आणि मुख्याध्यापकाचे चांगले संबंध होते. शाळेत न येताही ते सुजाता यादवची हजेरी लावत होते. याप्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन करून आवश्यकतेपेक्षा जास्त रजा घेतल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. मुख्याध्यापकांना सर्व माहिती असूनही त्यांनी खरी माहिती लपवल्याचं उघड झालं अशा स्थितीत शिक्षक आणि मुख्याध्यापक दोघांनाही निलंबित करण्यात आले.