उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एका मंदिरात चोराचा कारनामा पाहायला मिळाला आहे. चोराने आधी मंदिरात प्रवेश केला आणि नंतर देवी-देवतांच्या मूर्तींना नमस्कार केला. इकडे-तिकडे कोणी येतंय का ते आधी बघितलं आणि शेवटी नागदेवतेची मूर्ती आपल्या पिशवीत टाकून पळ काढला. चोरीची ही घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
शिवलिंगावरील नागदेवतेची मूर्ती तांब्याची असल्याचं सांगितलं जात आहे. ती चोर घेऊन गेला आहे. ही संपूर्ण घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सध्या पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहेत. त्याला लवकरच पकडले जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मेरठमधील भवानपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अब्दुल्लापूर येथे ही घटना घडली. जिथे एक प्राचीन शिवमंदिर आहे. मंगळवारी जेव्हा लोक पूजेसाठी या मंदिरात पोहोचले तेव्हा त्यांना नागदेवतेची मूर्ती गायब असल्याचं दिसलं, त्यानंतर एकच गोंधळ उडाला. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. तपासादरम्यान सीसीटीव्ही तपासले असता संपूर्ण घटना उघडकीस आली.
चोर मंदिरात कसा शिरला हे फुटेजमध्ये दिसत आहे. मग तो नमस्कार करतो. यानंतर तो शिवलिंगाच्या वर ठेवलेल्या नागदेवतेची मूर्ती उचलतो आणि आपल्या पिशवीत ठेवतो आणि पळ काढतो. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र व्हिडिओची दखल घेत चोरट्याचा शोध सुरू आहे. लवकरच चोर पकडला जाईल असं सांगितलं.