ऑनलाईन खरेदी करण्याकडे अनेकांचा अधिक कल असतो. सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना बिहारमधून समोर आली आहे.
नालंदाच्या परवलपूरमध्ये मीशोवरून मागवलेल्या ड्रोन कॅमेऱ्याच्या बदल्यात एका व्यक्तीला चक्क एक किलो बटाटे मिळाल्याची घटना घडली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ग्राहक मीशो डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हला पार्सल उघडण्यास सांगतो. डिलिव्हरी बॉयने पार्सल उघडले असता ड्रोन कॅमेऱ्याऐवजी त्यात 10 बटाटे सापडले. यानंतर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केला आहे.
चैतन्य कुमार या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने डीजेआय ड्रोन कॅमेरा मीशोवरून सवलतीच्या दरात घेतला होता. त्याने ऑर्डर केलेल्या ड्रोन कॅमेऱ्याची बाजारातील किंमत 84,999 रुपये होती पण तो Meesho वर 10,212 रुपयांना उपलब्ध होता. त्याला थोडासा संशय आला आणि त्याने कंपनीला याबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितलं.
मीशोने त्याला ही एक मोठी ऑफर आहे आणि म्हणूनच तो कॅमेरा इतक्या कमी किमतीत घेत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. त्याने संपूर्ण पेमेंट ऑनलाईन केले. परवलपूरचे एसएचओ यांनी याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एका व्यक्तीने ऑनलाईन लॅपटॉप मागवला होता. पण त्याला त्याऐवजी साबण मिळाला होता.