नवी दिल्ली: कोरोनाविरुद्धच्या लढाईत आज भारतानं महत्त्वाची कामगिरी केली आहे. लसीकरण अभियानात देशानं १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे जी व्यक्ती १०० कोटीव्या डोसची मानकरी ठरली, ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीची रहिवासी आहे. दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात १०० कोटीवा डोस देण्यात आला. अरुण रॉय नावाच्या व्यक्तीला हा डोस दिला गेला.
अरुण रॉय वाराणसीचे रहिवासी असून ते दिव्यांग आहेत. ऐतिहासिक डोसचे मानकरी ठरलेल्या रॉय यांनी आनंद व्यक्त केला. मात्र त्यासोबतच त्यांनी एक खंतही बोलून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोटो काढू शकलो नाही, अशी खंत रॉय यांनी व्यक्त केली. रॉय दिल्लीला आले होते, त्यावेळी देशानं ७० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला होता. १०० कोटीवा डोस आपणच टोचून घ्यायचा असं त्यावेळी त्यांनी मनोमन ठरवलं होतं. रॉय दिल्लीला त्यांच्या मित्राकडे आले होते. त्याच मित्रानं रॉय यांच्या लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं.
अरुण रॉय यांनी राम मनोहर लोहिया रुग्णालयात नोंदणी केली होती. रॉय यांनी ऐतिहासिक डोस घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी रॉय यांची भेट घेतली. आतापर्यंत लस का घेतली नव्हती याबद्दल मोदींनी रॉय यांना विचारणा केली. त्यावर मनात लसीबद्दल शंका होती, असं उत्तर रॉय यांनी दिलं. मात्र देशात ७० कोटी डोस देण्यात आल्यावर रॉय यांनी लस घेण्याचं ठरवलं.