नवी दिल्ली - आपलं अथवा आपल्या कुटंबीयांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही जण खूप कष्ट घेतात. अत्यंत मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्य़ा गोष्टी शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी आणि कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. पतीचं वृद्धाश्रमाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका महिलेने तब्बल 13 वर्षे अन्नग्रहण केलं नसल्याची घटना समोर आली आहे. पतीचं स्वप्न साकार करण्यासाठी महिलेने कठोर परिश्रम घेतले आणि आयुष्यभर केलेल्या बचतीतून वृद्धाश्रम उभारले आहे. उषा छापेला (Usha Chapela) असं या महिलेचं नाव असून त्या मारवाडच्या रहिवासी आहेत. मारवाडच्या (Marwad) मदर तेरेसा म्हणून त्या ओळखल्या जातात.
मिळालेल्या माहितीनुसार, पाली जिल्ह्यातील मारवाड जंक्शन येथील रहिवासी असलेल्या उषा छापेला या नरसिंहपुरा येथे शासकीय शाळेत शिक्षिका आहेत. 13 जून 2003 रोजी एका अपघातात त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यांचे पती राधेश्याम छापेला हेदेखील शासकीय शाळेत शिक्षक होते. राधेश्याम छापेला यांनी वृद्धाश्रम सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पतीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा निश्चय उषा यांनी केला. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांनी 13 वर्ष अन्नग्रहणही केलं नाही. फक्त फलाहार करून राहिल्या. पतीच्या मृत्यूनंतर मिळालेल्या विमा रकमेतून त्यांनी जमीन खरेदी केली. बचत केलेली सर्व रक्कम वृद्धाश्रमाच्या उभारणीसाठी वापरली आणि अखेरीस वृद्धाश्रमाचं स्वप्न साकार झालं.
सध्या या वृद्धाश्रमात 10 वृद्ध राहतात
वृद्धाश्रमाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पतीच्या स्मरणदिनी म्हणजेच 13 जून 2015 रोजी वृद्धाश्रम सुरू केला. या वृद्धाश्रमाचं नाव ज्ञानुषा असं ठेवण्यात आलं. सध्या या वृद्धाश्रमात 10 वृद्ध राहतात. येथे महिला-पुरुषांसाठी वेगळी स्वच्छतागृहं, हॉल, झोपण्यासाठी पलंग, स्वतंत्र कपाटं, फिरण्यासाठी बाग, मनोरंजनासाठी टीव्ही आणि म्युझिक सिस्टीम अशा सुविधा आहेत. वृद्धांना सकाळचा नाष्टा आणि दोन वेळचं जेवण देण्यासाठी दोन महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळोवेळी डॉक्टर्स येतात. वृद्धांच्या देखभालीचं काम एक तरुण करतो. मूल-बाळ नाही किंवा नातलग सेवा करू इच्छित नाही, असे बहुतांश वृद्ध येथे दाखल आहेत.
वृद्धाश्रम प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर 13 जून 2016 रोजी केलं अन्नग्रहण
ज्या वृद्धांना मुलं आहेत, त्यांना येथे बोलावून त्यांचं समुपदेशन करून त्यांच्यासोबत वृद्धांना परत घरी पाठवून दिलं जातं. काही वृद्धांचं वय जास्त असल्यानं किंवा गंभीर आजारामुळे त्यांची सेवा करणं कठीण जातं. हा वृद्धाश्रम प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर 13 जून 2016 रोजी अन्नग्रहण केलं. तोपर्यंत मी केवळ फलाहार घेत होते असं उषा छापेला यांनी म्हटलं आहे. पतीच्या पेन्शनमधून हा वृद्धाश्रम मी चालवते. माझा मुलगा घनश्याम छापेला आऊवा स्कूलमध्ये प्राचार्य, तर दुसरा मुलगा डॉ. दिनेश रॉय छापेला हा राजसमंदमध्ये एसडीएम आहे. गरज पडल्यावर माझी दोन्ही मुलं मला आर्थिक मदत करतात. काही व्यापारीदेखील वृद्धाश्रमासाठी मदत देतात असं उषा छापेला यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.