पंतप्रधान मोदींचा किस्सा खरा ठरला, अखेर 'तो' चहावाला सापडला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 06:15 PM2018-08-14T18:15:47+5:302018-08-14T18:17:03+5:30
पंतप्रधान मोदींनी 10 ऑगस्टला जागतिक जैव इंधन दिवसाच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात चहावाल्याची गोष्ट सांगितली होती.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चहा यांचं नातं सुपरिचित आहे. २०१४च्या निवडणुकीवेळी त्यावरून 'चाय पे चर्चा' रंगली होती. तशीच काहीशी चर्चा गेल्या चार-पाच दिवसांपासून रंगली होती. निमित्त होतं, पंतप्रधान मोदींनी सांगितलेली एका प्रयोगशील चहावाल्याची गोष्ट. हा चहावाला अखेर सापडला आहे आणि मोदींचा किस्सा खरा ठरला आहे.
पंतप्रधान मोदींनी 10 ऑगस्टला जागतिक जैव इंधन दिवसाच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात चहावाल्याची गोष्ट सांगितली होती. 'एका शहरात एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला चहा तयार करायचा. त्याच्या बाजूनं एक नाला वाहायचा. त्यानं एक छोटंसं भांडं पालथं घालून नाल्यावर ठेवलं. नाल्यातून निघणारा गॅस त्यानं आपल्या टपरीकडे वळवला आणि त्याच गॅसच्या मदतीनं तो चहा तयार करू लागला,' या उदाहरणातून त्यांनी जैव इंधनाची क्षमता दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, विरोधकांनी त्यांच्या या किश्श्याची खिल्ली उडवली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या गोष्टीचाच आधार घेत कर्नाटकातील सभेत मोदींवर शरसंधान केलं होतं. नाल्यात पाईप टाकून गॅस जमा करा आणि भजी तळा, हीच मोदींची रोजगार निर्मितीची योजना असल्याची टिप्पणी राहुल गांधींनी केली होती.
परंतु, मोदींच्या गोष्टीतील चहावाला आता समोर आला आहे. त्याचं नाव श्याम राव शिर्के असं असून तो छत्तीसगडची राजधानी रायपूरचा राहणारा आहे. आपल्या अभिनव संशोधनाबद्दल त्यांनी स्वतःच माहिती दिली. 'मी नाल्याचं पाणी जमा केलं आणि पाण्याचे बुडबुडे गोळा करण्यासाठी छोटा 'कलेक्टर' तयार केला. गॅस होल्डर म्हणून मी एक ड्रम घेतला आणि हे सगळं जोडून चाचणी केली. तेव्हा, स्टोव्ह पेटला आणि त्यावर चहाही बनवता आला, असं श्याम राव यांनी सांगितलं.
छत्तीसगड विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेनं हा प्रयोग पुढच्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी आपल्याला आर्थिक मदत केली होती. त्यानंतर हे संयंत्र मी नाल्यात लावलं, तेव्हा तीनच दिवसात बराच गॅस जमा झाला, असं श्याम राव म्हणाले. काही वैज्ञानिकांनी माझ्या प्रयोगाबद्दल उच्च अधिकाऱ्यांना कळवल्याचं सांगितलं, पण त्याला आता दोन वर्षं उलटली आहेत. इतक्यातच, मोदींनी माझ्या संशोधनाचं कौतुक केल्याचं कळलं आणि मी आता या प्रोजेक्टचं पेटंटही करून घेतलंय, असं त्यांनी अभिमानाने सांगितलं. काही वर्षांपूर्वी आपलं संयंत्र बिनकामाचं ठरवून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी फेकून दिलं होतं, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.