नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या काळात सरकारी डॉक्टरांना अद्यापही वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. राज्यातील रुग्णालयात काम करणारे कोविड वॉरियर्स गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आपल्या पगाराच्या मागणीसाठी या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलकांसोबत आता दिल्लीतील तीनही महापालिकेच्या महापौरांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर तीनही महापौरांनी आपली बैठक लावली असून डॉक्टराच्या पगारीची मागणी केली आहे. सरकारने आमच्यासोबत संवाद साधला पाहिजे. डॉक्टर आणि इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पगारीचा गुत्ता सोडविण्याची गरज आहे. उत्तर दिल्लीचे महापौर जय प्रकाश, पूर्व दिल्लीचे निर्मल जैन आणि दक्षिण दिल्लीच्या महापौर अनामिक सिंह यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. दिल्ली सरकारवर 13 हजार कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे, जोपर्यंत मुख्यमंत्री आमच्याशी बातचीत करणार नाहीत, तोपर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलनावर बसूनच राहणार असे तीनही महापौरींनी म्हटलंय.
म्युन्सिपल कॉर्पोरेशन डॉक्टर असोसिएशनच्या आर.आर. गौतम यांनी म्हटले की, जोपर्यंत पगारीसंदर्भातील आमची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही सुट्टीवरच राहणार आहोत. जर गेल्या 3 महिन्यांचे वेतन अदा केले नाही, तर सर्वच कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशाराही गौतम यांनी दिलाय.
दरम्यान, एनडीएमसीच्या अंतर्गत सुरू असलेल्या हिंदू राव, कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि वैद्यकीय स्टाफ आंदोलन करत आहे. 22 ऑक्टोबरपासून या कर्मचाऱ्यांचे जंतर-मंतर येथे धरणे आंदोलन सुरू आहे. गेल्या 4 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. यासंदर्भात महापौरांशी चर्चा केली असता, महापालिकेकडे पैसेच नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे, दिल्ली सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी केलीय.
भाजपा आणि आपमध्ये आरोप प्रत्यारोप
डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पगारीवरुन भाजपा आणि आम आदमी पक्षात आरोप प्रत्योरापांच्या फैरी झडत आहेत. दिल्लीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी राज्य सरकारवर आरोप लावले आहेत. राज्य सरकार जाणीवपूर्वक महापालिकांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे, डॉक्टरांच्या वेतनासाठी पैसे देत नसल्याचे गुप्ता यांनी म्हटलं. तर, आप नेते आणि दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटले की, महापालिकेकडे डॉक्टरांच्या वेतनासाठी पैसे नाहीत, पण बॅनरबाजी आणि होर्डींग्ज लावण्यासाठी पैसे आहेत. आंदोलनकर्ते डॉक्टर हे महापालिकेचे कर्मचारी असल्याचंही त्यांनी म्हटलंय.