नवी दिल्ली - दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबतत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांची आज दिल्लीत भेट झाली. ही भेट संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र ही अनौपचारिक भेट होती. त्यात राजकीय चर्चा झाली नाही, असे संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केले आहे.
आज सकाळी संभाजीराजे छत्रपती हे संजय राऊत यांच्या निवसास्थानी आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना या भेटीबाबत विचारले असता संभाजीराजे म्हणाले की, सांगायला काही हरकर नाही. संजय राऊत हे दरवर्षी मला आणि पवारसाहेबांना न चुकता जेवायला बोलावतात. आज मी चहा प्यायला आलो, बाकी काही नाही. दिल्लीचं हेच वैशिष्ट्य आहे. बाकी काही विशेष नाही.
दरम्यान, यावेळी मराठा आरक्षण आणि त्यासाठीच्या आंदोलनाबाबत विचारले असता संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत अनेक गोष्टी अडचणीत आहेत. मराठा आरक्षणाबाबतचे पाच प्रश्न महाराष्ट्र सरकार सोडवू शकते. पण ते सोडवले गेलेले नाहीत. त्याबाबत मराठा संघटना लवकरच निर्णय घेणार आहेत. त्यानुसार आम्ही वाटचाल करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.