ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 - उत्तराखंडमध्ये भाजपानं अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार या चर्चेला उधाण आलं आहे. भाजपाचा अजूनही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित झाला नाही. त्यासाठी शुक्रवारी भाजपाच्या आमदारांची एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीतच गटनेत्याची निवड होणार असून, मुख्यमंत्री ठरवला जाणार आहे. आमदारांचा गटनेत्याची पक्षाध्यक्ष अमित शाहांसोबत भाजपाचे उच्चस्तरीय नेतेमंडळी निवड करणार आहेत. 18 मार्च 2017ला दुपारी 3 वाजता नव्या सरकारचा शपथग्रहण समारंभ पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाहसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशातून विभक्त झाल्यानंतर उत्तराखंड विधानसभेची ही चौथी निवडणूक झाली. 70 सदस्यांच्या या विधानसभेत आजवर कोणत्याही पक्षाला 40 पेक्षा अधिक जागा कधी मिळाल्या नव्हत्या. भाजपाला यंदा 57 जागा मिळाल्या तर काँग्रेसला अवघ्या 11 जागांवर समाधान मानावे लागले. उत्तराखंडात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा दावेदार जाहीर केला नव्हता. तथापि कोणत्याही स्थितीत हे राज्य आपल्या ताब्यात यावे, यासाठी भाजपाची व्यूहरचना वर्षभरापासून चालली होती. (उत्तराखंडातही भाजपचा लक्षवेधी दिग्विजय)(उत्तर प्रदेशात भगवी लाट, भाजपाची जोरदार मुसंडी)उत्तराखंडसारखे उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपानं 312 जागांवर भगवा फडकवला आहे. हा विजय केवळ अभूतपूर्वच नाही तर भाजपाच्या भवितव्यासाठीही उत्साहवर्धक आहे. उत्तर प्रदेशची राजकीय विभागणी मुख्यत्वे पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य उत्तर प्रदेश, बुंदेलखंड व पूर्वांचल अशा चार भागांमध्ये होते. जाहीर निकालांमधे चारही क्षेत्रात भाजपने यंदा जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेशच्या मुस्लिमबहुल मतदारसंघातही भाजपचा भगवा डौलाने फडकला आहे. भाजपने वर्षभरापासून परंपरागत सवर्ण मतदारांखेरीज, गैरयादव ओबीसी व गैर जाटव दलितांना भाजपाकडे ओढण्याचे सर्वंकष प्रयत्न चालवले होते. या प्रयत्नांना चांगलेच यश प्राप्त झाले आहे, असे निकालातून स्पष्ट झाले. पूर्वांचलचे प्रमुख केंद्र वाराणसीत पंतप्रधानांसह साऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आपला तळ ठोकला होता. या भागात नोटबंदीने दुखावलेल्या बनिया, व्यापारी, ब्राह्मण व सवर्ण जातींच्या मतदारांना पुन्हा वश करण्यात भाजपने यश मिळवलेले दिसते. सुमारे 60 नेत्यांच्या कुटुंबीयांना भाजपने उमेदवारी दिली. ऐनवेळी अन्य पक्षातून दाखल झालेल्या अनेक उमेदवारांना अमित शाह यांनी तात्काळ तिकिटे वाटली भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते त्यामुळे नाराज आहेत, अशी चर्चा ऐकायला मिळाली. मोदींच्या लाटेत मात्र हे बहुतांश उमेदवार विजयी ठरले आहेत.
उत्तराखंडमध्ये उद्या भाजपा आमदारांची बैठक, 18 मार्चला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी
By admin | Published: March 16, 2017 7:06 PM