नवी दिल्ली - आगामी विधानसभा निवडणूक आणि नुकतेच झालेल्या पोटनिवडणुकां समीक्षा करण्यासाठी भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. राजधानी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे. मात्र, या बैठकीला ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी हे व्हर्च्युअली उपस्थित राहिले आहेत. पुढील वर्षी २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरु केली आहे. त्यानिमित्तच दिल्लीत ही बैठक होत आहे. या बैठकीला देशभरातून 124 पदाधिकारी उपस्थित आहेत.
जेपी नड्डा आणि पंतप्रधान मोदी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. तब्बल दोन वर्षांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असून मोदी सरकार 2 मधील ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे, या बैठकीत राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरणार असल्याचे दिसून येते. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले आहेत. तर राज्यस्तरावरील भाजप नेते या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना दिल्लीला बोलावण्यात आलेले नाही.